Mahesh Mhatre

कुणाला गावातील आपुलकीची हवा आवडलेली, तर कुणाच्या डोळ्यात गावची आभाळस्वप्ने दडलेली.. त्यामुळे अत्यंत निकड असल्याशिवाय कुणी गाव सोडत नाही आणि परिस्थितीच्या रेटयाने जरी त्या माणसाने गाव सोडले, तरी आठवणींच्या हातांनी त्याला जखडलेला गाव त्याची पाठ सोडत नाही, ही वस्तुस्थिती आहे. अशाच गावप्रेमाने भारलेल्या १०१ मान्यवर मराठी ‘प्रतिभावंतां’नी ‘प्रहार’च्या ‘वाडीवस्ती’ या लेखमालेत आपल्या गावाच्या आठवणी जिवंत केल्या. त्या आठवणी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्र, भारत आणि देशोदेशीच्या सीमा ओलांडून जगभर पोहोचावा, या हेतूने ‘राणे प्रकाशना’च्या वतीने ‘वाडी-वस्ती’च्या ‘ई-बुक’चे प्रकाशन ‘दिव्य मराठी’चे मुख्य संपादक कुमार केतकर यांच्याहस्ते, उद्योगमंत्री नारायण राणे, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत ‘प्रहार’च्या पाचव्या वर्धापनदिनाचे निमित्त साधून बुधवार, दि. तीन ऑक्टोबर २०१३ रोजी झाले. त्या ‘वाडीवस्ती’ची ही प्रस्तावना..


जन्माला येणा-या प्रत्येक व्यक्तीला जसे स्वत:चे नाव असते, अगदी तसेच आपले हक्काचे गाव असते. अगदी ज्यांचे बालपण पालकांच्या फिरतीच्या चाकाबरोबर या गावातून त्या गावाकडे फिरत गेलेले असते, तशा मुलांच्या मनातही एखादे गाव आयुष्यभर ‘घर’ करून बसलेले असते. त्या गावाचा, वाडीवस्ती वा महानगराचा आपला एक आगळा-वेगळा ऋणानुबंध असतो. अनेकदा तो ऋणानुबंध तुमची ओळखही बनून जातो, म्हणूनच असेल कदाचित श्रीकृष्ण म्हणताच गोकुळ-वृंदावनाचा उल्लेख आपोआप मनात प्रतिबिंबित होतो. महात्मा गांधी या नावाशी साबरमती हे नाव जुळलेले आहे, तद्वत आचार्य अत्रे यांच्या कार्यकर्तृत्वाशी सासवड, यशवंतराव चव्हाण यांच्या लोकसेवेशी कराड, वसंतदादा पाटील यांच्या लोकप्रियतेशी सांगली, बॅ. नाथ पै यांच्या लाघवी व्यक्तिमत्त्वाशी रत्नागिरी, बाळासाहेब ठाकरे यांच्या करारीपणाशी मुंबई या शहराची एक अकृत्रिम सांगड पडलेली दिसते आणि म्हणूनच सध्या साहित्य, संस्कृती, कला, उद्योग, क्रीडा आणि राजकारण अशा विविध क्षेत्रांत कार्यरत असणा-या प्रथितयश मान्यवरांना ‘प्रहार’ने त्यांच्या गावाबद्दल, परिसराबद्दल लिहायला सांगितले होते. त्यांच्या आपल्या गावाबद्दलच्या, परिसराबद्दलच्या मनोगतातून इतिहासातील अनेक अदृश्य दुवे नव्याने दृश्यमान व्हावेत, हा त्यामागील प्रामाणिक हेतू होता.

विश्वविख्यात कवी आणि आंबेडकरी चळवळीतील एक अग्रणी पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या लेखाने सुरू झालेली ही ‘वाडीवस्ती’ची लेखमाला सुमारे सव्वादोन वर्षे अव्याहतपणे सुरू होती. त्या अनुभव यात्रेने या १०१ मान्यवरांच्या हृदयातील हळुवार कोपरा ‘प्रहार’च्या वाचकांसमोर उघड केला होता, तो आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्र, भारत आणि देशोदेशीच्या सीमा ओलांडून जगभर पोहोचावा, या हेतूने ‘राणे प्रकाशना’च्या वतीने ‘वाडीवस्ती’च्या ‘ई-बुक’ची कल्पना प्रत्यक्षात आणण्यात येत आहे. छोटया वस्तीचे खेडयात, खेडयाचे गावात आणि गावाचे शहरात, त्याही पुढे गेल्यास महानगरात रूपांतर कसे होते, ही सारी प्रक्रिया अभ्यासण्यासारखी असते. काळाच्या ओघात अशी उत्क्रांतीच्या टप्प्यावर असणारी गावे नष्टही होत असतात. ज्या ठिकाणी लोकसंस्कृती रुजली, नांदली आणि फुलली त्या गावांचे ओसाडपण पाहणे भलतेच दु:खदायक असते. दोन दशकांपूर्वी अवघ्या महाराष्ट्राला हादरवणारा लातूर-किल्लारीचा भूकंप असो अथवा गुजरातच्या भूज परिसरातील नैसर्गिक आपत्ती असो, काहीही झाले तरी दु:खाने व्याकुळलेली माणसे गाव सोडत नाहीत, हे मी प्रत्यक्षपणे पाहिले आहे, कारण जन्मापासून आपली गावाशी नाळ जुळलेली असते. कुणाचा जीव गावाबाहेरून वाहणा-या नदीवर जडलेला असतो, तर कुणाला गावातील अवती-भवतीच्या जंगलाची ‘रानभूल’ पडलेली असते. कुणाला गावातील आपुलकीची हवा आवडलेली, तर कुणाच्या डोळ्यात गावची आभाळस्वप्ने दडलेली.. त्यामुळे अत्यंत निकड असल्याशिवाय कुणी गाव सोडत नाही आणि परिस्थितीच्या रेटयाने जरी त्या माणसाने गाव सोडले, तरी आठवणींच्या हातांनी त्याला जखडलेला गाव त्याची पाठ सोडत नाही, ही वस्तुस्थिती आहे.
अशाच गावप्रेमाने भारलेल्या १०१ मान्यवर मराठी ‘प्रतिभावंतांनी’ ‘प्रहार’च्या ‘वाडीवस्ती’ या लेखमालेत आपल्या गावाच्या आठवणी जिवंत केल्या. या आठवणी भलेही या सुप्रसिद्ध लोकांच्या व्यक्तिगत असतील, पण त्या तुमच्या मनातील आठवणींचे मोहोळ नक्कीच जागे करतील..
तसे पाहायला गेले तर स्थलांतर हा सृष्टीचा नियम आहे. स्थलांतराशिवाय माणूसच काय अगदी पशुपक्ष्यांनासुद्धा जगण्यासाठी अन्य पर्याय नसतो. स्थलांतर ही माणसाच्या सर्व क्षमतांची सत्त्वपरीक्षा असते. जगातील सगळ्याच महामानवांनी, धर्मसंस्थापकांनी, पराक्रमी पुरुषांनी स्थलांतर करीत आपले भाग्य घडवले; परंतु अफाट यश संपादन केल्यानंतरही त्यांच्या बालपणाला जोजवणारे, कुमारवयातील खोडया सहन करणारे गाव मनाच्या हळव्या कोप-यात कायम वस्तीला असते.

आपल्या गावाचा असा प्रत्येकाशी जिवा-भावाचा संबंध असतो. लग्नानंतर सासरी जाणा-या मुलीसाठी गावाची आठवण डोळ्यात पाणी आणणारी असते, तर नोकरी-धंद्यासाठी गाव सोडावे लागणा-यांसाठी सणासुदीला नटणारे, धर्म उत्सवात सजणारे, जत्रेचे-मौजेचे गाव जीवाला हुरहूर लावणारे असते.
प्राचीन महाराष्ट्रातील वसाहती आणि नगरे यावर म्हणावे तेवढे संशोधन झालेले दिसत नाही. दोन हजार वर्षापूर्वीच्या ‘गाथा सप्तशती’मध्ये जी वर्णने वाचायला मिळतात, त्यातही ग्राम अथवा नगरांची परिपूर्ण कल्पना, येत नाही. मात्र इतिहासकार वि. का. राजवाडे यांनी ‘महाराष्ट्राची वसाहत’ या निबंधात म-हाटी लोकांचा आणि त्यांच्या प्रांताचा विविधांगाने धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला आहे. राजवाडे म्हणतात, ‘महाराजाठ्ठन्’ या सूत्रात पाणिनी सांगतो की महाराज हा ज्यांच्या भक्तीचा विषय आहे, त्यांना ‘माहाराजिक’ म्हणतात. महाराज म्हणजे कोण? महाराज या शब्दाचे पाणिनीकाली दोन अर्थ होते. महाराज म्हणजे इंद्र व महाराज म्हणजे केवळ सामान्य राजांहून जो मोठा राजा तो. पैकी पहिला अर्थ घेतला तर माहाराजिक हे लोक इंद्राचे भक्त ठरतात. आणि दुसरा अर्थ घेतला तर महाराज संज्ञक किंवा महाराज पदवीधर भूपतीचे ते भक्त ते माहाराजिक ठरतात. तरीही या माहाराजिक शब्दाचा महाराष्ट्रिक शब्दाशी संबंध काय, हा प्रश्न राहतोच. हा प्रश्न असा सोडविता येतो, राजा ज्या भूमीवर राज्य करतो, त्या भूमीला राष्ट्र म्हणत आणि राष्ट्र हे ज्यांच्या भक्तीचा विषय त्यांना राष्ट्रिक म्हणत त्याप्रमाणेच महाराजा ज्या भूमीवर माहाराज्य करी त्या भूमीला महाराष्ट्र म्हणत. महाराजा हा ज्यांच्या भक्तीचा विषय त्यांना माहाराजिक म्हणत व महाराजाचे महाराष्ट्र हा ज्यांच्या भक्तीचा विषय त्यांना माहाराष्ट्रिक म्हणत.. आपला आजचा महाराष्ट्र हा अशा प्रकारे उत्क्रांत झाला आहे. अर्थात त्याच्याही आधी आर्य ज्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रांतात घुसून वसाहती करू लागले होते, तेव्हापासून ‘ग्राम’ ही संकल्पना आकारास येत होती. आर्याचे आरंभीचे जीवन पशूपालनाभोवती फिरत असे, त्यामुळे ‘जिथे चारा, तिथे निवारा’ या पद्धतीने ते भटकंतीचे जीणे जगत. या तात्पुरत्या निवा-याच्या ठिकाणी आर्य टोळ्या आपल्या गाई-गुरांची ‘गोत्र’मध्ये ठेवीत. त्या ‘गोत्रां’च्या अवती-भवती रक्ताच्या नातेवाइकांच्या झोपडया असत. पुढे आर्य टोळ्यांना शेतीचे तंत्र उमगले, स्थानिक अनार्यानीही त्यांना जगण्याचे नवे भान दिले, परिणामी गोत्र ज्याचा पुढे अपभ्रंश गोठयात झाला, ते गोत्र फक्त कौटुंबिक नातेसंबंध दर्शविणारा नाममात्र शब्द बनले. आर्याच्या वसाहती जशा अनेक गोत्रांनी गजबजू लागल्या, तशी ‘ग्राम’ कल्पना अस्तित्वात आली. नगर, जनपद हा ग्रामाचा आधुनिक आणि आकर्षक आविष्कार बनला. त्यातूनच ‘राज्या’च्या संकल्पनेचा जन्म झाला. ऋग्वेदाची एक शाखा असलेल्या ‘ऐतरेय ब्राह्मणा’त साम्राज्य, भौज्य, स्वाराज्य, वैराज्य, पारमेष्ठय, राज्य, माहाराज्य, अधिपत्य, स्वावश्य, आतिष्ठय व एकराज्य अशा ११ प्रकारच्या राजांचा, नरपतींचा उल्लेख येतो. आपल्याकडे आरतीनंतर जी मंत्रपुष्पांजली म्हटली जाते, त्यात वर उल्लेखिलेल्या राजांची ‘आठवण’ त्या श्लोकांचा अर्थ ठाऊक नसतानाही बहुतांश लोक करीत असतात. तो भाग वेगळा.

आपल्याकडे अगदी बौद्धकाळातही तीन महाराष्ट्र अस्तित्वात होते. त्यांना त्रमहाराष्ट्रिक म्हणत. त्या त्रमहाराष्ट्रकातील गावांबद्दल इतिहासकार राजवाडे लिहितात, ‘या त्रिमहाराष्ट्रक देशांत शकाच्या सहाव्या दशकांत ९९ हजार गावे होती, म्हणून ताम्रपटांत लिहिलेले आढळते, ते अक्षरश: खरे आहे.’ आजही त्या काळातील बहुतांश गावे नांदती असावीत. काळाच्या ओघात काही गावे ओस पडली असतील. पूर, दुष्काळ, रोगराई किंवा युद्ध-हाणामारी यामुळे काही गावांनी स्थलांतर केले असेल, ही वस्तुस्थिती मान्य केली तरी शककाळातील सहाव्या शतकात जी ९९ हजार गावे अस्तित्वात होती, त्यापैकी सत्तरेक हजार गावे, वाडी-वस्तीच्या रूपाने आजही टिकून असावीत. विद्यमान महाराष्ट्रात ३५ जिल्हयांमध्ये ३७८ मोठी गावे-शहरे आहेत, तर खेडयांची संख्या ४३ हजार ७११ आहे. गाव म्हटला की देशमुख, पाटील आलेच.

दोनेक हजार वर्षापूर्वी जी गणराज्ये अस्तित्वात होती, ती वसाहतीमधूनच उत्क्रांत झाली होती. या गणराज्यांतील आणि गणसंस्थांमधील जो जाणता-नेणता पुढारी असे तो ‘ज्येष्ठराज’ म्हणून संबोधला जाई. सा-या गणांचे नेतृत्व ज्याच्याकडे असे तो गणराज, गणपती म्हणून मान्य असायचा. गणांचे विघ्नांपासून रक्षण करणे हे त्याचे त्या काळात जे काम होते, ते आता २१ व्या शतकातही तो न चुकता करताना दिसतो. आपला ‘सुखकर्ता’ नेहमी प्रसन्न राहावा यासाठी तत्कालीन गण ज्याप्रमाणे गणेशाची त्या काळात काया वाचा मनोभावे पूजा करी, तशीच पण थोडयाफार फरकाने आजही केली जाते, कारण ‘इतिहासाची पुनरावृत्ती होत असते.’ अगदी सर्वसामान्य लोकांना कल्पना नसली तरी ऐतिहासिक अवशेष नव्याने वेगळ्या आकारात आपल्यासमोर येतात आणि आपले काम करीत असतात. त्याच न्यायाने चालुक्यांच्या राजवटीत महाराष्ट्रातील विविध गणराज्यांमध्ये जे ज्येष्ठराज होते, ते देशमुख बनले, कारण गणराज्यांच्या अस्तानंतर त्यांच्या सामाजिक नेतृत्वाला चालुक्यांनी वेगळे अधिष्ठान प्राप्त करून दिले होते. राजवाडे यांच्या मते, पाटील म्हणजे पट्टकील. पट्टकील या सामासिक शब्दाचा अर्थ त्यातील अवयव शब्दावरून स्पष्ट आहे. सम्राट अशोकादींच्या काळात कापसाचे विणलेले पट्ट लिहिण्यासाठी वापरीत, जमिनीच्या मालकीची नोंद या पट्टयांवर करीत आणि ते पट्ट कीलकांत म्हणजे वेळूच्या पोकळ कांडात सुरक्षित ठेवत. पट्टकील म्हणजे पट्ट ज्यांत ठेविले आहेत ती वेळूची पोकळ कांडे. हे पट्टकील ज्याच्या ताब्यात असत त्याला पट्टकीलक म्हणजेच पाटील म्हणत.’ तर अशा या पाटलांच्या ‘ताब्यात’ आजही हजारो गावे आहेत. अगदी अनेक जिल्हा परिषदा, पंचायत समिती आणि विधानसभेतही त्यांचे वर्चस्व नजरेत भरण्यासारखे आहे, कारण गावाचे पुढारपण करण्याची ‘कला’ त्यांच्या रक्तातून, गुणसूत्रातून संक्रमित होत आलेली दिसते. अशा पाटील-देशमुखांच्या अनेक गावांच्या कहाण्या या पुस्तकातून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत, अर्थात शहरी लोकवस्तीचे गजबजणारे कोपरेही चाळी, वाडयांच्या रूपातून तुम्हाला पाहायला मिळतीलच, पण त्याचबरोबर नागरी आणि ग्रामीण संस्कृतीचा एक नैसर्गिक संगम होऊन तयार झालेल्या समग्र महाराष्ट्रीय लोकजीवनाचे मनोज्ञ चित्रण या पुस्तकात दिसेल, असा मला ठाम विश्वास वाटतो.

आपले महाराष्ट्र राज्य, १०७ हुतात्म्यांच्या रक्तसाक्षी बलिदानाने प्रत्यक्षात आलेले आहे. त्या वर्षी १९६० मध्ये महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्येचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या केवळ २९ टक्के होते. आता ही संख्या पन्नास टक्क्यांहून अधिक झालेली दिसते. त्यामुळे आज आपल्याला जी ठाणे, डोंबिवलीसारखी शहरे माणसांनी गजबजून गेलेली दिसतात, ती स्थिती पन्नास वर्षापूर्वी नव्हती. त्यामुळे त्यासंदर्भातील लेखांमध्ये जेव्हा जुन्या गावस्वरूपात असणा-या डोंबिवली किंवा गिरगावचा उल्लेख वाचायला मिळतो, त्या वेळी मन आश्चर्याने थक्क होते आणि हेच लेख समजा आणखी पन्नास वर्षानी कुणी वाचले, तर त्याच्या आश्चर्याला सीमा उरणार नाही. १९१५ साली प्रसिद्ध झालेले मामलेदार त्रिंबक नारायण अत्रे लिखित ‘गावगाडा’ हे पुस्तक आजच्या काळात वाचताना त्यातील चमत्कारिक माहितीने माणूस मंत्रमुग्ध होऊन जातो. तत्कालीन गाव आणि त्यात राहणारे अठरापगड जाती-जमातींचे लोक, त्यांची जीवनशैली याबद्दल अत्रेंनी अत्यंत रोचक शब्दांत लिहिले आहे. त्यांचे लिखाण हे प्रत्यक्षानुभवावर बेतलेले असल्यामुळे त्यात माहितीबरोबर त्यांची रोखठोक मतेही वाचायला मिळतात. तत्कालीन म्हणजे एकोणविसाव्या शतकातील ग्रामीण समाज किती पद्धतीने पिळला जात होता, याचे अत्रे तपशीलवार वर्णन करतात. गावातील अलुतेदार आणि बलुतेदार यांचे शेती करणा-या कुणब्याशी असणारे संबंध मांडताना ते तत्कालीन समाजात असणारा काळी आणि पांढरीचा फरक सहजपणे दाखवतात. शेती कसणारा कुणबी आणि त्याच्यासोबत शेतात राबणारा काही अलुतेदारांचा वर्ग हा ‘काळी आई’चा आश्रित. तर गावात, गावपांढरीत राहणारा, बलुतेदारांचा वर्ग हा त्या शेतक-याच्या आश्रयाने जगत असे; परंतु जसजसे इंग्रजांचे पाय भारतीय मातीत घट्ट रुजत गेले तसतसे गावपांढरीत राहून गावाच्या आश्रयाने आनंदाने जगणारे अलुतेदार-बलुतेदार व्यावसायिक काळी आईच्या आस-याला धावले. परिणामी एकाच वेळी आपल्याकडील ग्रामोद्योग तर कोसळलाच; पण त्याचा सारा भार शेतीवर पडल्याने आमची अवघी कृषीव्यवस्था अक्षरश: दबून गेली आणि सगळयात दु:खाची गोष्ट म्हणजे इंग्रजांच्या कंपनी सरकारला हाकलून देण्याऐवजी पेशवे आणि त्यांच्या सरदारांनी त्यांचे फिरंगी राज्य जास्तीत जास्त मजबूत व्हावे असेच प्रयत्न केले. अत्रे एके ठिकाणी लिहितात की, तत्कालीन पेशव्यांनी मामलेदाराच्या पदांचे लिलावच लावले होते. ज्याच्याकडे पुरेसे पैसे असतील त्याला ‘बाजीरावाला भरपूर पैसे देऊन ते पद विकत घेता येत होते.’ आजही सत्तेच्या दालनात काही पुणेकर बाजीराव पैसे घेऊन मोक्याच्या जागा विकताना दिसतात. त्यामुळे एकोणाविसाव्या शतकात सर्वसामान्य शेतकरी म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असणारा कुणबी जसा तुटलेला होता, तसाच आजही आहे. त्याच्या दु:खावर फुंकर घालण्याचा देखावासुद्धा करायला कुणाकडे वेळ नाही. मग त्याची दु:खे दूर करण्याच्या प्रयत्नांची गोष्ट दूरच आणि म्हणूनच असेल कदाचित आपल्या म-हाटी समाजात आपल्याच रक्तनात्याचे हजारो भाऊबंद शेतकरी आत्महत्या करतात, तरी वर्तमानपत्रांचे शब्दअस्त्रांत रूपांतर होताना दिसत नाही. कथा, कादंब-या आणि कवितांना भविष्याच्या कल्पनांचा नादखुळा सोडवत नाही आणि इतिहासात रमलेल्यांना भूतकाळाचे रिकामे ओझे पेलवत नाही, अशी सध्याची स्थिती आहे. याचा अर्थ आमच्याकडे नागरी जगण्याचे चित्रण चांगल्या पद्धतीने होत आहे, असेही नाही. आजही उपसंपादकाची नोकरी मागायला येणाऱ्या बहुतांश पत्रकारितेच्या पदवीधारकांचे आवडते पुस्तक पु. ल. देशपांडे यांची ‘बटाटयाची चाळ’ हेच आहे. कुसुमाग्रज, गोविंदाग्रज आदी कवींची त्यांना नावेही ठाऊक नाहीत, मग त्यांची संपूर्ण नावे विचारायचे धाडस तरी कोण करणार?

थोडक्यात काय तर, आमच्या समाजजीवनाचा खराखुरा इतिहास लिहिण्याचा आम्ही फारसा कधी विचार केला नाही. त्यामुळे तसा प्रयत्न करण्याची कुणाला प्रेरणा मिळाली नाही. म्हणूनच असेल कदाचित आपल्याकडे ऐतिहासिक दस्ताऐवज जपण्याची, ऐतिहासिक संदर्भ असलेल्या गोष्टी सांभाळण्याची पद्धतच नाही. फार दूर कशाला जायचे, काही महिन्यांपूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा चष्मा वर्ध्याच्या आश्रमातून चोरीला गेला होता. त्यानंतर तो लंडनमधील एका मौल्यवान वस्तूंचा लिलाव करणा-या कंपनीकडे सापडला. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवारही अशीच इंग्लंडच्या म्युझियममध्ये पडून आहे. ज्या समाजाला ‘दृष्टी’ देण्याचा गांधीजींनी प्रयत्न केला, तो आमचा भारतीय समाज त्यांचा साधा चष्मा सांभाळू शकला नाही आणि ज्या अखिल हिंदुस्थानाला महाराजांनी आदर्श राजाचा वस्तुपाठ घालून दिला, त्यांची तलवार ‘पेलण्याची’ शक्ती आमच्यात नसणे, हे कर्मदरिद्रीपणाचे लक्षण आहे. जो समाज इतिहासात रमतो, तो इतिहासजमा होतो; पण जो समाज इतिहासातून ‘धडे’ शिकतो, तोच इतिहास घडवतो.. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन ‘राणे प्रकाशन’ने मान्यवरांच्या आयुष्यातून पुढे आलेली सामाजिक इतिहासाची १०१ मानाची पाने तुमच्यासमोर आणली आहेत. त्यातून नवतंत्रज्ञानाची कास धरून ज्ञानयुगाच्या यात्रेला निघालेल्या तरुणाईला आयुष्यभर पुरून उरेल इतके विचारधन आहे. अनुभवाच्या भट्टीत तावून-सुलाखून निघलेल्या या अनुभवसमृद्ध कथनाने विस्मृतीत गेलेली अनेक गावे ‘जिवंत’ होतील, त्यातील प्रसिद्ध, अप्रसिद्ध पात्रे तुमच्याशी बोलतील, त्यांच्या सुख-दु:खाच्या कहाण्या सांगतील. पुढील अनेक वर्षे, आमच्या ‘वाडीवस्तीत’ तुमचे स्वागत असेल.. ‘येवा, गाववाल्यानु, हय़ो गाव, वाडी, वस्ती तुमचीच आसां!’

दैनिक प्रहारच्या ‘कोलाज’ पुरवणीत प्रसिद्ध झालेल्या या ‘वाडीवस्ती’च्या लेखमालेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्टय म्हणजे पुंडलिक वझे यांच्या सिद्धहस्त कुंचल्यातून साकारलेली चित्रमाला. प्रत्येक लेखकांच्या भावविश्वात सदेह प्रवेश करून वझे यांनी ज्या पद्धतीने त्या लेखकाचे मनोव्यापार चित्रबद्ध केले आहेत, त्याला तोड नाही. म्हणूनच जेव्हा दोन प्रथितयश प्रकाशन संस्थांनी ‘वाडीवस्ती’चे पुस्तकरूपाने प्रकाशन करण्याचा प्रस्ताव ‘प्रहार’कडे मांडला होता, त्या वेळी वझे यांच्या सुरेख चित्रांशिवाय ते पुस्तक छापण्याची कल्पनाच असहय वाटली. परिणामी ते दोन्ही प्रस्ताव मागे पडले आणि ‘स्मार्ट सोल्युशन्स’ या श्रीधर मदुराई आणि श्रीधर म्हैसूर यांच्या सुप्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनीने जेव्हा ई-बुक प्रसिद्ध करण्याचा विचार मांडला, त्या वेळी साहजिकच ही ‘वाडीवस्ती’, वझे यांच्या चित्रांसह लोकांना विनामूल्य देण्याचा एकमुखी निर्णय झाला. एकूणच काय तर मराठी मुलखाच्या सीमा ओलांडत नव्या आभासी विश्वात १०१ वाडया-वस्त्या वसणार आहेत. त्यासाठी माझे दोन सहकारी समीर करंबे आणि प्रमोद गणेशे यांनी अफाट मेहनत घेतली आहे. त्यांच्या या सर्जनशील योगदानाबद्दल आणि प्रख्यात कला दिग्दर्शक प्रदीप म्हापसेकर यांनी सजवलेल्या सुयोग्य मुखपृष्ठासाठी आभार.

नामदेव ढसाळ / चंद्रमोहन कुलकर्णी / सुरेखा पुणेकर / रवीमुकूल/ सुरेश खरे/ प्रभाकर कोलते/ अरुण जाखडे/ राजन खान/ अनंत सामंत/ मृणाल गोरे/ यशवंत गडाख/ रत्नाकर मतकरी / मधुकर नेराळे/ डॉ. रवी बापट/ भीमराव पांचाळे/ शाहीर संभाजी भगत/ श्रीकांत मोघे/ झेलम परांजपे/ फादर फ्रान्सिस दिब्रिटो/ केसरी पाटील/ लिलाधर हेगडे/ अर्जुन डांगळे/ सचिन जकातदार/ डी. एस. कुलकर्णी/ सुलोचना चव्हाण/ राजू शेट्टी/ शोभा डे/ लक्ष्मण गायकवाड/ इंद्रजित भालेराव/ शं. ना. नवरे/ विठ्ठल उमप/ बी. जी. कोळसेपाटील/ उर्मिला पवार/ मधुकर तोरडमल/ प्र. ल. मयेकर/ दत्ता इस्वलकर / अशोक पवार/ प्रवीण बांदेकर/ बाळ ठाकूर/ सुरेश चिखले/ सुनील बर्वे/ सुबल सरकार/ ज्योती सुभाष/ विठ्ठल वाघ/ वीणा जामकर/ दासू वैद्य/ पल्लवी जोशी/ एन. चंद्रा/ प्रेमानंद गज्वी/ सचिन खेडेकर/ सयाजी शिंदे/ प्रदीप मुळ्ये/ श्रीनिवास खळे / रमेश देव/ जयंत सावरकर/ स्वानंद किरकिरे/ श्रीधर फडके/ अजित वाडेकर/ अशोक पत्की/ आशालता वाबगावकर/ स्मिता तळवलकर/ सदाशिव अमरापुकर आणि इतर अनेक मान्यवरांनी ‘प्रहार’साठी लिहिलेली ‘वाडीवस्ती’ आता ई-बुक स्वरूपात..

विनामूल्य वाचण्यासाठी भेट द्या- http://prahaar.in/e-book

Categories:

Leave a Reply