इसवी सन पहिल्या ते पंधराव्या शतकापर्यंत भारत अक्षरश: सुवर्णभूमी म्हणूनच ओळखला जात होता. येथील सुबत्ता आणि संपत्तीच्या सुरस कथांनी युरोपियन जग भारताकडे आकर्षित झाले. मायकल एडवर्ड्स यांनी ‘अ हिस्ट्री ऑफ इंडिया’ या ग्रंथात पोर्तुगाल आणि इंग्लंडची पावले आपल्या देशाकडे कशी वळली, याचा सुरेख मागोवा घेतला आहे. एडवर्ड्स लिहितात, पंधराव्या शतकात पोर्तुगीज सत्ताधारी पोपच्या आशीर्वादाने अत्यंत प्रभावशाली बनले होते. त्यामुळे इस्लामच्या वाढत्या प्रभावाला आळा घालणे ही आपली जबाबदारी आहे, अशी त्यांची भावना झाली होती. त्याच भावनेतून भूमध्यसागरीय देशातील इस्लामी सत्ताधा-यांचा भारत आणि चीनच्या व्यापारावर असलेला प्रभाव नष्ट करण्यासाठी त्यांनी भारताकडे मोर्चा वळवला होता. त्यामधूनच, १४९८ मध्ये केप ऑफ गुड होपला वळसा घालून वास्को-द-गामा कालिकतच्या किना-यावर पोहोचला. भारतभूमीवर समुद्रमार्गाने झालेले ते पहिलेच आक्रमण होते. तत्पूर्वी सगळी आक्रमणे खबर खिंडीतून झाली होती.. वास्को-द-गामाच्या कालिकतमधील आगमनाची संपूर्ण कहाणी ‘अ जर्नल ऑफ द फर्स्ट व्हायेज ऑफ वास्को-द-गामा’ या पुस्तकात सांगितली आहे. त्यात एका ठिकाणी हा धाडसी दर्यावर्दी उद्गारतो, ‘भारताची ही सफर किती भाग्याची आहे, दोस्तानो, देवाला धन्यवाद द्या. सोने, हिरे, रत्नांनी खच्चून भरलेल्या भूमीत आपण आलो आहोत.’ पोर्तुगीजांसह इंग्लंड, फ्रान्स आदी देशांनी भारताचे ऐश्वर्य अक्षरश: धुवून नेले आणि आपले देश संपन्न बनवले.. संपन्न भारतभूमीत पुन्हा सुवर्णयुग अवतरू शकते, ते काही कठीण नाही. त्यासाठी किमान दोन-चार पिढयांनी स्वत:ला कामात गाडून घेणे गरजेचे आहे. मात्र तसे करण्याऐवजी शोभन सरकार नावाच्या एका साधुबाबाच्या स्वप्नावर विश्वास ठेवून आमचे सरकार गुप्तधनाच्या शोधात निघाले आहे.. त्यामुळे आमच्या सरकारची जगभरात शोभा झाली, हे मात्र खरे! लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ‘स्मशानातलं सोनं’ ही कथा एकेकाळी प्रचंड गाजली, आता हे ‘स्वप्नातलं सोनं’ गाजत आहे.
कुणाला गावातील आपुलकीची हवा आवडलेली, तर कुणाच्या डोळ्यात गावची आभाळस्वप्ने दडलेली.. त्यामुळे अत्यंत निकड असल्याशिवाय कुणी गाव सोडत नाही आणि परिस्थितीच्या रेटयाने जरी त्या माणसाने गाव सोडले, तरी आठवणींच्या हातांनी त्याला जखडलेला गाव त्याची पाठ सोडत नाही, ही वस्तुस्थिती आहे. अशाच गावप्रेमाने भारलेल्या १०१ मान्यवर मराठी ‘प्रतिभावंतां’नी ‘प्रहार’च्या ‘वाडीवस्ती’ या लेखमालेत आपल्या गावाच्या आठवणी जिवंत केल्या. त्या आठवणी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्र, भारत आणि देशोदेशीच्या सीमा ओलांडून जगभर पोहोचावा, या हेतूने ‘राणे प्रकाशना’च्या वतीने ‘वाडी-वस्ती’च्या ‘ई-बुक’चे प्रकाशन ‘दिव्य मराठी’चे मुख्य संपादक कुमार केतकर यांच्याहस्ते, उद्योगमंत्री नारायण राणे, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत ‘प्रहार’च्या पाचव्या वर्धापनदिनाचे निमित्त साधून बुधवार, दि. तीन ऑक्टोबर २०१३ रोजी झाले. त्या ‘वाडीवस्ती’ची ही प्रस्तावना..
जगभरातील सोळा शहरांमध्ये घेण्यात आलेल्या प्रामाणिकपणाच्या चाचणीत आपल्या मुंबईने दुसरा क्रमांक मिळवला आहे. मुंबईवर प्रेम करणा-या सर्वच लोकांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे. एरवी नको त्या गुन्हयांसाठी चर्चेत असणा-या मुंबईच्या या प्रामाणिकपणाचा प्रत्यय अनेकदा रिक्षा-टॅक्सी चालवणा-यांच्या वस्तू, पैसे, सोने परत करण्याच्या कृतीतून येत असतो. मुंबईकरांचा हा चांगुलपणा आणि कोणत्याही स्थितीत तडजोड करण्याची सहनशील वृत्ती अन्यत्र पाहायला मिळत नाही; कारण मुंबईचे चारित्र्य येथील उदार, दानशूर आणि समाजहितैषी श्रीमंतांच्या कार्यातून घडले आहे. या लक्ष्मीवंतांनी मुंबईकरांना आरोग्य, विद्या, संपन्नता आणि राजकीय सामर्थ्य लाभावे यासाठी आपला पैसा खर्च केला.. एकेकाळी सात बेटांची असणारी मुंबई आज सात शेठांची झालेली आहे.. तिच्या जीवावर उडया मारणा-या या धनिकांनी मुंबईच्या सव्वा कोटी लेकरांकडे दुर्लक्ष करू नये, कारण ही मुंबा-आई जेवढी धनिकांना प्रिय तेवढीच तुम्हा-आम्हा सगळ्यांचीच आवडती आहे..