Mahesh Mhatre

इंटरनेट ही आज आपल्याला नवी नसलेली संकल्पना फक्त २० वर्षापूर्वीच लोकांसाठी खुली झाली. ३० एप्रिल १९९३ रोजी अधिकृतपणे ‘वर्ल्ड वाइड वेब’ अर्थात माहितीचे महाजाल लोकांसाठी खुले झाले. सर्वसामान्य माणसाला ज्ञानाचा अधिकारी बनवणारी ही घटना जागतिक इतिहासात अत्यंत महत्त्वाची आहे. अग्नी, चाक, छपाईयंत्र आणि आता इंटरनेट या शोधांनी मानवी जीवनाला, वर्तनाला आणि एकूण लोकव्यवहाराला वेगळी दिशा दिली. ‘विचार’ हे या सगळया शोधांचे मुख्य कारण आहे. म्हणून छापखाना वा इंटरनेट हे वैचारिक क्रांतीचे उगमस्थळ आहेत. अवघ्या २० वर्षात इंटरनेटने जगातील एक तृतीयांश लोकांना प्रभावित केले आहे. पुढील २० वर्षात ते जगाच्या सीमा ओलांडून बाहेर गेले असेल. टी-२० क्रिकेट स्पर्धेत रमलेल्यांनी जरा या विचारविश्वातही डोकावून पाहावे...

हजारो वर्षाच्या मानवविकासाच्या प्रक्रियेत गुहेत राहणा-या, शिकारीवर जगणा-या, पशुतुल्य माणसाने विचाराची साथ कधी सोडली नाही. अगदी आदिमानवावस्थेतही निवारा शोधताना, प्राण्यांची शिकार करताना माणसाने आपला हेतू कमीत कमी वेळात, सहजपणे आणि मुख्य म्हणजे निर्धोकपणे साधता यावा याचा ध्यास घेतला. परिणामी अन्य पशुपक्ष्यांच्या तुलनेत मनुष्यप्राणी प्रचंड वेगाने बदलत गेला, त्याच्या या बदलाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये अग्नीचा आणि चाकाचा शोध हे आरंभीच्या काळातील दोन शोध अत्यंत महत्त्वाचे ठरतात. अग्नीने आदिमानवाला जगण्याची, आत्मरक्षणाची ‘ऊर्जा’ दिली, तर चाकाने माणसाच्या प्रगतीची गती वाढवली. या दोन महत्त्वाच्या शोधांनी माणसाचे जगणे खूपच सुलभ केले. त्यामुळे पहिल्या काही हजार वर्षात सर्वच प्राचीन धर्मानी, धर्मसंस्कृतींनी -हिंदू, पारशी, पेगन, माया आदींनी- अग्नीला देवत्व प्रदान केले होते. ‘चक्रा’चे महत्त्व तर एवढे वाढले होते की, विष्णू - श्रीकृष्णाच्या हातातील एक महत्त्वपूर्ण अस्त्र (जे कुठेही जाऊ शकत होते) असे मानाचे स्थान त्याला लाभले होते. या दोन शोधांच्या तोडीचे आणखी दोन अत्यंत महत्त्वपूर्ण शोध गेल्या पाच-सहा शतकात लागले आणि त्यांनी एकूणच मानवी जगण्याचा आवाका आणि अवकाश बदलून टाकला. या शोधांपैकी इंटरनेटचा शोध हा तसा अलीकडचा असला तरी त्याने माणसाने जगणे, वागणे, विचार करणे आदी सगळ्याच गोष्टींवर प्रभाव टाकलेला आहे. या माहितीच्या महाजालात प्रवेश करण्यास सर्वसामान्य माणसाला संधी मिळाली, त्या घटनेला ३० एप्रिल रोजी २० वर्षे झाली.

तसे पाहायला गेल्यास लक्षावधी वर्षाच्या मानवी उत्क्रांतीच्या कालखंडात वीस वर्षे म्हणजे फारच छोटा कालावधी, पण या काळात इंटरनेटने माणसांच्या विचार-वर्तन आणि व्यवहाराच्या संज्ञा बदलल्या. जागतिक सर्वेक्षणानुसार सध्या जगातील एक तृतीयांश म्हणजे अंदाजे दोन कोटी माणसे इंटरनेटने जोडलेली आहेत. ‘गुगल’ ही १९९८ मध्ये लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांनी स्थापन केलेली कंपनी आज इंटरनेटमध्ये सर्वाधिक पसंतीची आहे. साधारणत: दररोज एक कोटी लोक त्यांच्या ‘सर्च इंजिन’ वा ई-मेलचा वापर करतात. त्यापाठोपाठ ‘फेसबुक’ने प्रचंड मोठी मुसंडी मारून मानवी संभाषण - साहचर्य आणि सहकार्याला नवे परिमाण दिलेले दिसताहेत. भारताचे म्हणाल, तर जगाच्या नकाशावर आज अमेरिका, चीनपाठोपाठ भारतात इंटरनेटने जोडलेल्या लोकांचे प्रमाण जास्त आहे. ‘क्लेनर पर्किन्स कॉफिल्ड अ‍ॅण्ड बायर्स’च्या २०१२ च्या सर्वेक्षणानुसार भारतात एकूण लोकसंख्येच्या ११ टक्के म्हणजे १३ कोटी ७० लाख लोकांकडे इंटरनेटची सुविधा आहे. १९९८ मध्ये इंटरनेटधारकांचे प्रमाण फक्त ०.१ टक्का होते. यावरून हे माहितीचे महाजाळे किती वेगाने पसरत आहे, याचा अंदाज येतो. केंद्र सरकारच्या माहितीनुसार, देशात ९० कोटी मोबाइलधारक आहेत. त्यांनाही इंटरनेटची सुविधा घेणे शक्य आहे. ‘स्टॅट काउंटर डॉट कॉम’ यांच्या सर्वेक्षणानुसार २०१२ च्या उत्तरार्धात ५८.७८ टक्के मोबाइलधारकांनी इंटरनेट सेवेचा लाभ घेतल्याचे स्पष्ट झाले होते. थोडक्यात सांगायचे तर शहरी भागातील श्रीमंत-सुशिक्षितांपुरती मर्यादित असणारी इंटरनेट सेवा आता ग्रामीण आणि दुर्गम भागातील लोकांपर्यंत पोहोचत आहे.

१४४५ साली जर्मनीतील गटेनबर्ग या अत्यंत विचारी माणसाने लावलेल्या छपाईयंत्राच्या शोधाने अवघ्या मानवजातीला ‘घडवले’ होते, अगदी तशीच भूमिका एकविसाव्या वर्षात पदार्पण करणा-या इंटरनेटकडे आली आहे आणि विशेष म्हणजे गटेनबर्गच्या शोधाने जसे ज्ञान आम लोकांपर्यंत मोकळे केले, अगदी तशीच व्यापक पातळीवरील कामगिरी इंटरनेट करीत आहे. हा योगायोग नाही, तर ती आहे, माणसाच्या ज्ञान आणि विचारसाधनेची अविरत सुरू असलेली धडपड.

अग्नी, चाक, गटेनबर्गचे छपाईयंत्र आणि आता इंटरनेट या चार शोधांचे नेहमीच महत्त्व राहणार आहे. पहिल्या दोन शोधांनी मानवजातीचे भौतिक जीवन सुखमय केले. दुस-या दोन शोधांनी माणसाला नैतिक बनवले. गटेनबर्गने १४४५मध्ये पहिल्यांदा ‘बायबल’ छापले तोपर्यंत, हा धर्मग्रंथ आणि त्यातील धर्मज्ञान हे मूठभर धर्मसत्ताधीशांच्या हाती होते. त्यामुळे ते सांगतील तो धर्म आणि ते देतील ती धर्माज्ञा, असे एकूण धर्माचे स्वरूप होते; पण गटेनबर्गने त्यांच्या धार्मिक एकाधिकारशाहीला कोणताही आव न आणता आव्हान दिले, मुख्य म्हणजे छपाईयंत्राचा शोध लागेपर्यंत हाताने लिहिले जाणारे सारेच ग्रंथ लॅटिन भाषेत लिहिले जात असत, कारण ती भाषा विद्वानांची होती; परंतु छपाईयंत्राने सामान्यांच्या भाषेतील पुस्तकांचा मार्ग मोकळा केला. विशेष म्हणजे छपाईचे तंत्र सोपे आणि स्वस्त असल्यामुळे सर्व प्रकारची पुस्तके, दैनंदिनी आणि वृत्तपत्रांच्या एका मोठया प्रवासाची गटेनबर्गने सुरुवात केली.

छपाईयंत्राचा शोध भलेही युरोपात लागला होता आणि त्याचे आरंभीचे परिणाम फक्त त्याच खंडापुरते मर्यादित होते, मात्र छापलेल्या शब्दांच्या सामर्थ्यांचा संपूर्ण विश्वाला प्रत्यय येण्यास फार वेळ लागला नाही. छपाईयंत्रामुळे मोजक्या लोकांच्या हातातील ज्ञान वेगाने अन्य विचार करणा-या लोकांपर्यंत पोहोचू लागले, त्यामुळे युरोपातील ज्ञान-विज्ञानाच्या क्षेत्रात काम करणा-यांना प्रचंड बळ मिळाले. सोळाव्या शतकानंतरच युरोपात वैज्ञानिक प्रयोगांना मोठय़ा प्रमाणावर वेग आला. त्यातून लागलेले शोध उपयोगात आणून युरोपीय दर्यावर्दीनी जगभर मुशाफिरी सुरू केली. त्यातूनच भारत-चीनसारखे सर्वसंपन्न देश आणि अमेरिकेसारखे ओसाड प्रदेश पादाक्रांत करत युरोपीय देशांनी अफाट संपत्ती कमावली. इंग्लंडची औद्योगिक क्रांती ही त्याचे उत्तम उदाहरण ठरेल. वॅटने लावलेल्या बाष्पावर चालणा-या इंजिनाच्या शोधामुळे १७६० ते १८२०-४० या दरम्यान गतिमान झालेल्या इंग्लंडच्या औद्योगिक क्रांतीला सगळा कच्चा माल भारतातून पुरवला गेला होता. ‘भारतीय राष्ट्रवादाचे जनक’ मानल्या जाणा-या दादाभाई नौरोजी यांनी, १८७६ मध्ये लिहिलेल्या ‘भारतीय दारिद्रया’वरील प्रदीर्घ निबंधात इंग्रज सरकारने चालविलेल्या आर्थिक पिळवणुकीची आकडेवारीसह माहिती दिली होती. अर्थात त्यामुळे जरी ब्रिटिशांच्या अमानुष वर्तणुकीत फरक पडला नसला, तरी विचारी भारतीय लोकांच्या मनात स्वातंत्र्याच्या कल्पनेने मूळ धरले होते. तर अशा या छपाईयंत्राने युरोपातील धर्मसत्ता जरी कमकुवत केली होती, तरी राजसत्तेला धडक देण्याची क्षमता त्यात निर्माण होण्यास काही शतके जावी लागली, मात्र ती अंगभूत ताकद असल्यामुळे छपाईयंत्राच्या शोधाने दुर्लक्षित, कोप-यात पडलेल्या मानवतावादी विचारांना बरे दिवस आले.

आणि आज ज्या लोकशाहीचे फायदे आम्ही उपभोगत आहेत, त्या लोककल्याणकारी समाजव्यवस्थेची चर्चा १६ व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झाली. ज्याला ‘रेनेन्सॉ’ पुनरुत्थान किंवा नवचेतनेचे पर्व म्हटले जाते, त्या काळात साहित्य, संस्कृती आणि कलेच्या क्षेत्रात क्रांतिकारक बदल होत होते. प्राचीन लॅटिन आणि ग्रीक साहित्यातील मानवतावादी आणि उदार विचारांचा छपाईच्या यंत्रामुळे नव्याने उच्चार व्हायला लागला. आपल्याकडील वेदांमध्ये ज्याप्रमाणे मानवी भावभावना आणि निसर्गाच्या उदात्ततेच्या अधिष्ठानाला महत्त्व आहे, तद्वत ग्रीक-लॅटिन विचारवंतांनी माणूस, मानवी बुद्धी, विचार आणि त्याच्या पृथ्वीवरील अस्तित्वाचा नैसर्गिक आविष्कार यासंदर्भातच लिखाण केले होते. नवचेतना पर्वात या दीड-दोन हजार वर्षे जुन्या विचारांना आधुनिक कसोटीवर घासून पाहण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. युरोपीय देशात सुरू झालेले हे वैचारिक संक्रमण हळूहळू जगभर पोहोचले आणि त्याद्वारे जगात मानवतावादी दृष्टिकोनासोबत वैचारिक क्रांतीची पहाट झाली. त्यातून अभिजात वाङ्मय आणि जातपातविरहीत, धर्मनिरपेक्ष विचारसरणीचा विकास होत गेला. फ्रेंच राज्यक्रांतीने ज्या त्रिसूत्रीचा गजर केला, त्या ‘स्वातंत्र्य, समता आणि बंधुता’ यांची बीजेही त्याचकाळात रोवली गेली होती. थोडक्यात सांगायचे तर छपाईच्या नव्या तंत्राने जगाला वैचारिक सामर्थ्य दिले आणि नित्य नव्या वाटा धुंडाळण्यास कार्यप्रवृत्त केले, म्हणून जग बदलले. आता इंटरनेटने तर त्याच्याही पुढे पाऊल टाकले.

इंटरनेटचा मराठी अर्थ ‘माहितीचे महाजाल’ असा सांगितला जात असताना इंटरनेट म्हणजे, ‘आभासी विश्व’ आहे, हे विसरता येत नाही. होय, इंटरनेट म्हणजे जणू अवकाशाच्या पोकळीत निर्माण झालेली प्रतिसृष्टी. इंटरनेटचा जन्मही ज्ञानेश्वरांच्या ‘पसायदाना’ची प्रत्यक्षात उतरलेली वस्तुस्थिती असावी असे मला अनेकदा वाटते. विश्वात्मक देवाकडे ‘पसायदान’ मागताना ज्ञानेश्वर माऊलींनी साकडे घातले होते की, ‘दुरितांचे तिमीर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो। जो जे वांछील। तो ते लाहो। प्राणीजात’

इंटरनेटमध्ये शब्दश: हे सामर्थ्य आहे. ‘भूतां परस्परे जडो। मैत्र जीवाचे’ या माऊलींच्या इच्छेचा प्रत्यय फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर वारंवार येताना दिसतो. ज्ञानेश्वरांनी एका ओवीमध्ये ‘हे विश्वची माझे घर। एैसी मती, जयाची स्थिर। किंबहुना सर्वही चराचर। आपणची झाला’ अशी उपमा दिली होती. इंटरनेटने ‘जग हे खेडे’ ही कल्पना प्रत्यक्षात आणून दाखवताना या वैश्विक जाणिवांना आवाज दिला. त्यामुळे आज जगाच्या कानाकोप-यात कुठेही जरासे खुट्ट वाजले, तरी त्याचे पडसाद सर्वत्र उमटतात. इंटरनेटने माणसा-माणसातील स्थळ-काळाचे अंतर पार नष्ट केले आहे.

आज जगातील एक तृतीयांश लोकांच्या जीवनाचा भाग बनलेल्या इंटरनेटचा जन्म मात्र आमच्या युद्धखोरवृत्तीमुळे लागलेला आहे. नाही म्हणायला विसाव्या शतकातील सर्वच महत्त्वाचे शोध, हे युद्धात यश मिळविण्याच्या इच्छेतून सुरू झालेल्या संशोधनकार्यातून लागले, ही वस्तुस्थिती आहे. दुस-या महायुद्धानंतर ज्यांच्या साम्राज्यावरील सूर्य कधीही मावळत नसे, ते इंग्लंड मागे पडले आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात अमेरिकेचा दबदबा वाढला. अफाट औद्योगिक प्रगतीच्या बळावर मिळवलेल्या आर्थिक यशाला लष्करी शोधकार्याकडे वळवून अमेरिकेने आपले एक वेगळे स्थान निर्माण केले, त्यामुळे साम्यवादी रशियाला टक्कर देण्यासाठी, कम्युनिस्ट विचारसरणीचा पराभव करण्यासाठी फक्त अमेरिका सक्षम आहे, अशी वातावरणनिर्मिती झाली होती. रशियाने कोणत्याही क्षेत्रात संशोधन करायला सुरुवात केली की, अमेरिका आपण त्यांच्यापेक्षा पुढे आहोत, हे दाखवण्यासाठी पुढचे पाऊल टाकत असे. इंटरनेटची निर्मितीही या अशा स्पर्धेतूनच झाली.

अमेरिकेने जगात सर्वप्रथम अणुबॉम्बचा वापर करून आपले उपद्रवमूल्य प्रस्थापित केले होते; परंतु त्यांच्या त्या अतिरेकी साहसाने अमेरिकन नेतृत्वात एक प्रकारचा भयगंडही रुजवला होता. आजही अमेरिकेत प्रवेश करणा-या कोणत्याही परदेशी व्यक्तीची ज्या पद्धतीने चौकशी होते, यावरून अमेरिकेच्या मनातील भयग्रस्तता स्पष्ट दिसते. १९६० च्या दशकात संगणकनिर्मिती करीत असताना अमेरिकेतील शास्त्रज्ञांना आपल्या संगणकावर रशिया आणि अन्य देशासंदर्भातील माहिती-गुपिते कशी सांभाळावीत, असा प्रश्न पडला होता. समजा आपल्या तळावर रशियाने बॉम्बहल्ला केला, तर आपली सगळी गुपिते नष्ट होणार, याची अमेरिकेला चिंता होती. म्हणून शास्त्रज्ञांनी माहितीचा संचय एका संगणकातून दुस-या संगणकात पाठविण्याचे तंत्र शोधून काढण्याचा प्रयत्न सुरू केला. १९६५ मध्ये त्याला पहिले यश आले. ‘एमआयटी लिंकन लॅब’च्या थॉमस मेरील आणि टॉबट्स या दोघा तज्ज्ञांनी सर्वासमोर ‘टीएफ-२’ हा संगणक सांता मोनिकास्थित दुस-या संगणकाला टेलिफोन लाइनने जोडला. जगात प्रस्थापित झालेले हे पहिले ‘नेटवर्क’ म्हणजे इंटरनेटची बाल्यावस्था म्हटले पाहिजे. लष्करी गुपितांच्या आणि माहितीच्या देवाणघेवाणीसाठी सुरू झालेले हे नेटवर्क पहिल्या दशकातच विस्तारले गेले, पण जगाला त्याची काहीच माहिती नव्हती. अमेरिकेच्या लष्कराने आणि गुप्तचर विभागाने या संपर्कक्षेत्रात क्रांती घडविणाऱ्या शोधाची अन्य देशांना खबर लागू नये, याची दक्षता घेतली होती; परंतु १९७२ मध्ये बॉब काहन या संगणकतज्ज्ञाने वॉशिंग्टन येथील हिल्टन हॉटेलात भरलेल्या आंतरराष्ट्रीय संगणक संपर्क परिषदेत ‘अर्पानेट’ या इंटरनेटच्या प्राथमिक अवताराचे दर्शन घडवले आणि जगाला काही तरी लोकविलक्षण घडत असल्याचा साक्षात्कार घडला. १९७० ते १९८५ या काळात इंटरनेटमध्ये आमूलाग्र बदल होत गेला. संगणक, जो एका खोलीत मावेल एवढा मोठा असायचा, तो लोकांच्या सोयीसाठी छोटा होत गेला. इंटरनेटच्या एकूण संशोधनावर असलेले ‘सैनिकी’ प्रभुत्व कमी व्हावे, यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्न करू लागले, त्यामुळे १९८५ नंतर इंटरनेटशी संबंधित सॉफ्टवेअर बाजारात उपलब्ध होऊ लागली. १९८८ मध्ये व्यावसायिक ‘ई-मेल’ची सुरुवात झाली. जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या व्यक्तीशी काही सेकंदात पत्रव्यवहार शक्य आहे, हे त्या काळी अद्भुत वाटणारे वास्तव ई-मेलने प्रत्यक्षात आणले होते. त्याला लोकांचा अफाट प्रतिसाद मिळाला. त्यामुळे इंटरनेटच्या विस्ताराच्या नवनव्या कल्पना उदयाला येऊ लागल्या, ‘चॅटिंग’ची कल्पना त्याच काळात समोर आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जिथे वास्तव्य करतात त्या व्हाइट हाउसची वेबसाइट सुरू झाली. त्याचवर्षी म्हणजे ‘अर्पानेट’ रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करण्याच्या तयारीत असताना, १९९३ मध्ये ‘वर्ल्ड वाइड वेब’ ज्याला संगणकीय भाषेत ‘www’ म्हटले जाते, ते अवघे माहितीचे मायाजाल सर्वसामान्य लोकांसाठी खुले झाले.

बरोबर २० वर्षापूर्वी, ३० एप्रिल १९९३ रोजी ‘युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लीअर रिसर्च’ या संस्थेत, इंटरनेटच्या जन्मस्थळी ‘वर्ल्डवाइडवेब’ जगासाठी खुली झाल्याची घोषणा टिम बर्नर्स ली याने केली आणि जगाच्या इतिहासात एक नवा टप्पा आल्याची नोंद झाली. १९९५ मध्ये ‘विदेश संचार निगम लिमिटेड’ने (व्हीएसएनएल) भारतात इंटरनेट आणले, त्या वेळी ही सुविधा फार कमी लोकांच्या आवाक्यातील होती. मी १९९७ मध्ये ‘व्हीएसएनएल’च्या ‘सरकारी’ अडथळ्यांचा सामना करीत ही सेवा मिळवली होती. अत्यंत महागडी तेवढीच कटकटीची इंटरनेट सुविधा मोठी गमतीची होती. इंटरनेटसाठी मोडेम सुरू केल्यावर ‘करकर’ असा आवाज यायचा, कधी दहा-पंधरा मिनिटांत तुम्ही ‘ऑनलाइन’ व्हायचात, तर कधी त्यासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागे; पण १९९८ मध्ये केंद्र सरकारने पहिला ‘इंटरनेट टेक्नॉलॉजी अ‍ॅक्ट’ आणला. सोबत इंटरनेटच्या क्षेत्रात खासगी उद्योगांना घुसायला अनुमती दिल्याने ‘व्हीएसएनएल’ची मक्तेदारी संपली. परिणामी भारतीय ग्राहकांना वेगवान सेवा मिळू लागली आणि आता तर मोबाइलवरही इंटरनेट सेवा उपलब्ध असल्यामुळे माहितीचा व ज्ञानाचा सर्वदूर प्रसार होणे सोपे झाले आहे.

गरिबी, बेकारी आणि भ्रष्टाचार आदी सा-या सामाजिक समस्यांचे मूळ अज्ञानात आहे. अज्ञान दूर केले तरच समाजात वैचारिक क्रांती होते. जिथे विचार असतात, तिथे विकार उरत नाहीत, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. त्यामुळे इंटरनेट सुविधा ही भारतासाठी ज्ञानगंगा ठरू शकते. फक्त त्या सुविधेचा वापर सर्वाच्या भल्यासाठी झाला पाहिजे. महात्मा जोतिबा फुले यांनी अत्यंत प्रतिकूल वातावरणात हेच विचारस्वातंत्र्याचे रोपटे आपल्या महाराष्ट्रभूमीत लावले होते. त्या रोपटयाला शाहू महाराज-डॉ. आंबेडकर-आगरकर आदी विचारवंतांनी खतपाणी देऊन ते वाढवले. त्याचा आज महावृक्ष झाला असला तरी त्याची फळे समाजाच्या दुर्लक्षित घटकांपर्यंत अद्यापि पोहोचलेली नाहीत, काहींनी तर या महावृक्षांच्या सावलीवरही कब्जा केला आहे. इंटरनेटचा प्रसार हे या सगळ्यावर उत्तर असेल; कारण अवघ्या २० वर्षाच्या आयुष्यात जगातील एक तृतियांश लोकसंख्येला प्रभावित करणारे हे माध्यम पुढील २० वर्षात अवघे विश्व व्यापून उरलेले असेल. कदाचित मंगळावर वस्तीला असणा-या माणसांनाही आम्ही इंटरनेटच्या प्रेमरज्जूने बांधलेले असेल.

इंटरनेटच्या ताकदीचा आवाका ब-याच इंटरनेट वापरणा-यांनाही ठाऊक नाही. केवळ ई-मेल, चॅटिंग, फेसबुक, ट्विटर म्हणजे इंटरनेट नाही, तर कागदरहित सरकार, कागदरहित आर्थिक व्यवहार या दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींसोबत इंटरनेट म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उन्मुक्त आविष्कार आहे. तो जसे इजिप्तमधील सरकार पाडू शकतो, तद्वत ओबामासारख्यांना निवडून येण्यास मदतही करतो. इंटरनेटच्या जगातही प्रत्यक्ष जगण्यात येतात, तसे अनुभव येतात. वास्तव जीवनात जसे चोर, उचक्के भेटतात, तसे तिथेही असतात; परंतु त्यामुळे इंटरनेट दोषी ठरत नाही. आपण त्यातील चांगल्या गोष्टींकडे लक्ष दिले, तर अफाट फायदा होऊ शकतो. ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या अभ्यासानुसार इंटरनेटवर दररोज ७० लाख पानांचा मजकूर ‘अपलोड’ होत असतो, आपण जर गुगलवर ‘अमेरिकेचा इतिहास’ असे शब्द लिहिले आणि शोध घ्यायला गेलो, तर साडेसात कोटी पानांचा मजकूर समोर येतो.. इंटरनेट अवघे विशीत असताना एवढी प्रगती, मग पुढचे काय सांगावे..? आपण फक्त भगिरथाच्या निष्ठेने आयती चालून आलेली ज्ञानगंगा समाजाच्या तळागाळापर्यंत नेण्याचा प्रयत्न करू या!

Categories:

Leave a Reply