‘अॅग्रिकल्चर इज कल्चर ऑफ इंडिया’ म्हणजे शेती ही भारताची संस्कृती आहे, असे म्हटले जाते. पूर्वी ती वस्तुस्थिती होती. आता ती दिवसेंदिवस बदलत चालली आहे. शंभर वर्षापूर्वी इंग्रजांनी सर्व बाबतीत स्वयंपूर्ण असणारी ग्रामस्वराज्याची व्यवस्था मोडून काढली होती. तरीही ‘उत्तम शेती, मध्यम धंदा आणि कनिष्ठ नोकरी’ असेच मानले जात असे. आज २१ व्या शतकात, ‘उत्तम नोकरी, मध्यम धंदा आणि कनिष्ठ शेती’ अशी स्थिती झाली आहे, कारण आमच्या कृषिआधारित लोकजीवनाला शेतीचे अर्थकारण सांभाळता आले नाही. परिणामी दिवसेंदिवस शेती आणि शेतकरी यांची स्थिती दयनीय होत चाललीय. त्याकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नाही. ‘अन्नदाता’ बळीराजा शेती कसतो, म्हणून आम जनतेचे जगणे सुलभ होते; पण अस्मानी- सुलतानीच्या टाचेखाली हा बळीराजाच जर बळी गेला तर शेतीची माती होईल.. मग उंच टॉवरमध्ये, आलिशान बंगल्यात बसून तुम्ही काय खाणार?
इंटरनेट ही आज आपल्याला नवी नसलेली संकल्पना फक्त २० वर्षापूर्वीच लोकांसाठी खुली झाली. ३० एप्रिल १९९३ रोजी अधिकृतपणे ‘वर्ल्ड वाइड वेब’ अर्थात माहितीचे महाजाल लोकांसाठी खुले झाले. सर्वसामान्य माणसाला ज्ञानाचा अधिकारी बनवणारी ही घटना जागतिक इतिहासात अत्यंत महत्त्वाची आहे. अग्नी, चाक, छपाईयंत्र आणि आता इंटरनेट या शोधांनी मानवी जीवनाला, वर्तनाला आणि एकूण लोकव्यवहाराला वेगळी दिशा दिली. ‘विचार’ हे या सगळया शोधांचे मुख्य कारण आहे. म्हणून छापखाना वा इंटरनेट हे वैचारिक क्रांतीचे उगमस्थळ आहेत. अवघ्या २० वर्षात इंटरनेटने जगातील एक तृतीयांश लोकांना प्रभावित केले आहे. पुढील २० वर्षात ते जगाच्या सीमा ओलांडून बाहेर गेले असेल. टी-२० क्रिकेट स्पर्धेत रमलेल्यांनी जरा या विचारविश्वातही डोकावून पाहावे...