‘युवा’ हा शब्द उलट लिहिला की ‘वायू’ हा शब्द तयार होतो. विशेष म्हणजे, दोन्ही शब्दांमधून सारखाच अर्थ ध्वनित होतो. शक्ती, सामर्थ्य, चपळाई आणि नवनवोन्मेषशालि प्रतिभा म्हणजे तरुणाई. हे लखलखते तारुण्य आज अवघ्या भारतवर्षाला लाभले आहे. भारताचे आजचे सरासरी वय 25 आहे. पुढील 10 वर्षात या तरुणाईतून 40 कोटी बुद्धिमान तरुणांची फौज जगभरातील महत्त्वाच्या पदांवर आरूढ झालेली दिसेल, असे भाकीत ‘द इकॉनॉमिस्ट’ या अत्यंत प्रतिष्ठित साप्ताहिकाने व्यक्त केले आहे. अवघ्या जगाला भारताच्या या सुप्तशक्तीची जाणीव झाली आहे. अशा वेळी भारताचे नेतृत्व एका सुजाण, संयमी आणि सुसंस्कृत तरुणाकडे गेले पाहिजे. त्या तरुणाकडे सगळे जग ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ म्हणून पाहत असेल; परंतु सद्य:स्थितीतील भारताचे राजकारण पाहता, हा गांधी घराण्याचा वारसदार पंतप्रधानपदाचा सगळ्यात योग्य उमेदवार आहे...
शंभरी गाठलेल्या हिंदी सिनेमाने आजवर अनेक स्थित्यंतरे पाहिली. आरंभी तो पुराणांमध्ये रमला कारण तत्कालिन भारतीय समाजालाही पौराणिक चमत्कृतीचे आकर्षण होते. स्वातंत्र्योत्तर काळात हिंदी सिनेमाचे सामाजिक भान जागे झाले. त्यानंतर दर आठ-दहा वर्षानी हिंदी सिनेमा कात टाकून नवा अवतार धारण करताना दिसत गेला. आजही ही बदलाची प्रक्रिया सुरू आहे. या बदलत्या रूपातील हिंदी सिनेमाने सामाजिक वास्तव कधी नव्हे एवढय़ा प्रमाणात स्वीकारायला सुरुवात केली आहे. त्यामुळे विवाहबाह्य संबंध, समलिंगी संबंध, जबरदस्त हिंसाचार अशा एक ना अनेक नको वाटणा-या गोष्टी समाजातून सिनेमात झिरपत आहेत. हिंदी सिनेमाचा पहिला सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या काळातील सिनेमा आणि आजचे चित्रपट यांची तुलनाच करता येत नाही. काळ बदलला, कायदे बदलले, जगण्याचे वायदे बदलले. हिंदी चित्रपटांची लोकप्रियता मात्र कायम तशीच राहिली. कारण सिनेमा हे भारतीयांच्या जगण्याचे प्रतिबिंब मानले जाते.. सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या जाण्याने रूपेरी पडद्यावरील हे आभासी वास्तव हलले..
‘स्वप्नवासवदत्ता’ हे भासाने सुमारे दोन हजार वर्षापूर्वी लिहिलेले नाटक आजही अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे. त्यातील ‘कालक्रमेण जगत, परिवर्तमाना:’ हे वासवदत्ताच्या तोंडचे वाक्य तर ‘कालानुसार जगात परिवर्तन होत जाते’ या त्रिकालाबाधित सत्याचा उत्कट आविष्कार मानला जातो. सध्या काळ म्हणजे इंग्लिशमध्ये ज्याला ‘टाइम’ म्हटले जाते, तेच शीर्षक असणाऱ्या मासिकाला वासवदत्ताच्या वाक्याची वारंवार आठवण येत असावी आणि त्या उर्मीतूनच ‘टाइम’च्या पत्रकार क्रिस्ता महर यांनी भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हे ‘अंडरअचिव्हर’ आहेत. त्यांना त्यांचे काम चोखपणे करता येत नाही, असा शोध लावला असावा. ज्या ‘टाइम’ने मनमोहन सिंग यांना जगातील पहिल्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये समाविष्ट केले होते. त्याच साप्ताहिकाने अवघ्या दोन वर्षात डॉ. सिंग यांना ‘कुचकामी राज्यकर्ता’ म्हणून घोषित करावे आणि ‘टाइम’ने फार मोठा शोध लावला आहे, तेव्हा आपण त्याचे समर्थन केलेच पाहिजे म्हणून भाजप-शिवसेनेने ‘टाइम’ची तळी उचलायची, या सगळ्या घटनाक्रमात एक सुसंगती आहे. ती सगळी सुसंगती लावताना एका संघटीत यंत्रणेच्या हालचालींचा अंदाज येतो.. ‘टाइम’चा लेख अगदी ‘वेळेवर’ प्रसिद्ध होणे, ही या हालचालींची नांदी आहे. आपल्याला अमेरिकेतील हे साप्ताहिक फार प्रतिष्ठित वगैरे वाटत असेल; पण ते यावेळी ‘वेड पांघरून, पेड न्यूजवाले’ झाले आहे..
‘कुणब्याच्या जन्मा जाशी तर पेरू-पेरू मरशी, वाघाच्या जन्मा जाशी तर तोलू-तोलू मरशी पन् काथोड्याच्या जन्मा जाशी तर जंगलचा राजा होशी’ अशी एक म्हण कातकरी जमातीत प्रचलित होती. तसे पाहायला गेल्यास सर्वच आदिवासी जमातींना आपल्या जंगलावरच्या स्वामित्वाबद्दल अभिमान असतो; परंतु इंग्रजांच्या आगमनापासून आदिवासींना जंगलातून हुसकावून लावण्यात आले आणि त्यांच्या जगण्याचा आधारच तुटला. 1861 मध्ये ब्रिटिश लॉ अॅण्ड रेव्हेन्यू सुपरिटेंडेंड वेडन-पॉवेल याने सर्वप्रथम देशात वन कायदा लागू केला, लेखणीच्या एका फटका-यानिशी त्याने भारतातील सर्व जमीन व जंगले इंग्रजांच्या मालकीची केली. त्याचा सगळ्यात जास्त फटका आदिवासींना बसला. जंगलातील फळे-फुले, कंदमुळे आणि शिकार यावर जगणारा आदिवासी त्याच्याच जंगलात उपरा ठरला. आजही परिस्थिती बदललेली नाही. त्यामुळे परवा केंद्रीय आदिवासी विकासमंत्री व्ही. किशोरचंद्र देव यांनी महाराष्ट्रासह 17 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना ‘वनहक्क कायद्या’ची अमलबजावणी करताना आदिवासी जमातींची पुरेशी काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. आता तरी शासकीय यंत्रणांनी आणि आदिवासींच्या नावावर मोठ्या झालेल्या राजकारण्यांनी आणि तथाकथित समाजसेवकांनी आदिवासी विकासाचे प्रामाणिक प्रयत्न सुरू करावेत. अन्यथा भावी पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत!
आपल्या जनतेचे जगणे आनंदमयी आणि आरोग्यदायी करणे हे सरकारचे पहिले कर्तव्य आहे. त्याचबरोबर आपला परिसर आणि पर्यायाने देश स्वच्छ आणि सुंदर ठेवणे, ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. भारताच्या दुर्दैवाने सरकारी पातळीवर स्वच्छतेच्या विषयाकडे लक्ष दिले जात नाही आणि आम्हा भारतीयांना तर स्वत:च्या घरापलीकडे स्वच्छतेचा विचार करण्याची सवय झालेली नाही. परिणामी अस्वच्छ वातावरणामुळे आमच्या एकूणच जगण्याचा स्तर खाली आला आहे. ‘असेल जिथे स्वच्छता- तिथे वसे देवता’ असे म्हणतात; परंतु आमचे रस्ते, बस वा रेल्वे स्थानक, गल्ल्या, सरकारी कार्यालये, कुठेही जा, तुम्हाला गलिच्छ, ओंगळवाणे दृश्य दिसणारच. कच-यांचे ढीग, घोंघावणा-या माशा, डास हे जणू आमच्या जगण्याचे अविभाज्य घटक झाले आहेत.. अकाली उद्भवणा-या साथीच्या रोगांचे उगमही या घाणीतच दडलेले असतात. हे सगळे ठाऊक असूनही आम्ही सुधारायला तयार नाही.. बदलत्या जगाबरोबर पुढे जायला तयार नाही.. शाळेत आम्ही ‘नागरिकशास्त्र’ शिकलो, पण जगलो नाही!