Mahesh Mhatre


उद्या 23 एप्रिल. म्हणजेच ‘जागतिक पुस्तक दिन’. त्यानिमित्ताने पुस्तकं, त्यांचं वाचन, त्यांचा संस्कार आणि त्यांच्याकडून मिळणारा वारसा याविषयी चर्चा करणारा हा विशेष लेख..


पुस्तकांचे विश्व मोठे अजब असते. मन मोहून टाकणारे, जीवन बदलवून टाकणारे! अर्थात ज्यांचा पुस्तकांशी शाळा-महाविद्यालयातील अभ्यासाशिवाय संपर्क आला नाही, त्यांना पुस्तकांच्या या गुणवैशिष्ट्यांचा परिचय असण्याचे काहीच कारण नाही. खरे सांगायचे तर अशा मंडळींचीच संख्या जगात जास्त दिसते; परंतु पुस्तकांवर प्रेम करणा-या पुस्तकप्रेमींची संख्याही कमी नाही. माहिती-तंत्रज्ञानाच्या युगामध्ये ज्ञान, माहिती आणि मनोरंजन माध्यमांमध्ये प्रचंड बदल होत गेले.


या नव्या बदलांनी माणसातील माणूसपण बदलत गेले; पण पुस्तकातील पुस्तकपण अद्याप शाबूत आहे, हे सुदैव! अर्थात पुस्तकछपाई, निर्मिती आणि वितरणाच्या एकंदर प्रक्रियांमध्ये खूपच प्रगती झाली. आधी हाताने लिहिली जाणारी पुस्तके, कागदाचा शोध लागण्यापूर्वी भुर्जपत्र, रेशमी कापडावर लिहिली जाणारी पुस्तके 1440 मध्ये जोहान्स गटेनबर्गच्या महत्त्वपूर्ण संशोधनामुळे ‘छापली’ जाऊ लागली. गटेनबर्गच्या या एका शोधाने जगातील ज्ञानाचा ठेका घेतलेल्या धर्मसत्तेला सुरुंग लागला. जर्मनीत गटेनबर्गने 1450 मध्ये बायबल छापायला सुरुवात केली. त्याने आपल्या प्रिंटिंग प्रेसमध्ये बायबल छापण्यापूर्वी सामान्य ख्रिस्ती माणसाला त्याचे दर्शन दुर्मीळ होते. गटेनबर्गने तो लोकांना उपलब्ध करून दिल्याने धर्मग्रंथात नेमके काय सांगितले आहे, याची माहिती लोकांना होऊ लागली. धर्माच्या मक्तेदारांसाठी हा मोठा धक्का होता.

गटेनबर्ग तेथेच थांबला नाही. 1454 मध्ये त्याने ‘इंडलजन्सेस’ छापायला सुरुवात केली. या एक प्रकारच्या शिफारसपत्रांची तत्कालिन युरोपियन समाजात क्रेझ होती. ख्रिस्ती धर्मगुरू पोप लोकांकडून पैसे घेऊन पापमुक्त केल्याची शिफारसपत्रे देत. त्यात अगदी स्वर्गप्रवेशाचीही खात्री दिलेली असायची! गटेनबर्गने त्याची छपाई केल्याने धर्मसत्तेच्या वर्चस्वाला ओहोटी लागली आणि सामान्य माणसांमध्ये ज्ञानाचा प्रसार सुरू झाला. जगात परिवर्तनाची पहाट उगवली. पुस्तकांच्या जोडीला जगात वृत्तपत्रांचाही प्रसार आणि प्रभाव वाढला. आज प्रगत आणि पुरोगामी देशांमध्ये अस्तित्वात असलेली लोकशाही हे या पंधराव्या शतकापासून सुरू झालेल्या ज्ञानप्रसाराचे फलित आहे.

सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला ज्ञानाच्या आयुधामुळे जगण्याचे बळ लाभते, हे वारंवार सिद्ध झाले आहे. त्यामुळेच असेल कदाचित अफाट सामर्थ्य असणा-या धर्म आणि राजसत्तेला संपवण्यासाठी लोकांच्या विचारांचे प्रगटीकरण होणे, ही एकच गोष्ट पुरेशी ठरली. युरोप-अमेरिकेप्रमाणे आपल्या देशातही ही वैचारिक लढाई अशाच पद्धतीने उभी राहिली. संत ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेतील भगवतगीतेचा अर्थ मराठीमध्ये सांगणे हे मोठे बंड होते. ज्ञानेश्वरांपूर्वी जातीय समतेला महत्त्व देणा-या, ज्ञानाच्या कक्षा सर्वासाठी खुल्या करणा-या नाथपंथीय मच्छिंद्र आणि गोरक्षनाथांनी, महानुभाव संप्रदायाच्या सर्वज्ञ चक्रधरांनी, वीरशैव किंवा लिंगायत तत्त्वज्ञान मांडणा-या बसवेश्वरांनी आपापल्या पद्धतीने प्रस्थापित धर्मसत्तेला सुरुंग लावले होते.

नाथसंप्रदायाच्या ‘गोरक्षगीता’ आणि अन्य ग्रंथामध्ये ज्ञानाचा अधिकार सर्वाना असल्याचे सांगितलेले दिसते. चक्रधरस्वामी जरी गुजराती होते, तरी त्यांनी मराठीला महानुभाव संप्रदायाची धर्मभाषा बनवली. गावकुसाबाहेरील लोकांना खरा धर्म समजावून दिला. त्यासाठी खास साहित्य निर्माण केले. मराठीतील उपलब्ध गद्य-पद्य वाङ्मयाचे कर्तेपण महानुभवांकडे जाते, ते त्यामुळेच.

थोडक्यात, अभिजनांच्या भाषेत आणि ताब्यामध्ये असलेले ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत आल्याने लोकांना देवा-धर्माचे आकलन होऊ लागले. त्या जोरावर ज्ञानोबांच्या नंतर सुमारे तीनशे वर्षानी लिहिते झालेल्या देहूच्या तुकाराम महाराजांनी

वेदांचा तो अर्थ, आम्हासची ठावा
येरांनी वहावा, भार माथा

असे ठामठोक विधान केले. तो काय फाजील अभिमानाचा दंभोद्गार नव्हता, तो होता अखंड अभ्यासाने आलेल्या आत्माभिमानाचा आवाज. ‘तुकारामाची गाथा’ हातात घेतली, तर प्रत्येक अभंगातून हा आवाज वेगवेगळ्या पद्धतीने ध्वनित होतो. दुर्दैवाने आपल्याकडे अगदी शंभर-सव्वाशे वर्षापर्यंत ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी, तुकोबांची गाथा, एकनाथी भागवत किंवा नामदेवादी संतांचे अभंग फक्त वारकरी संप्रदायाच्या लोकांपुरतेच मर्यादित होते. आजही स्थिती फारशी बदललेली नाही.

स्वातंत्र्यपूर्वकाळात ब्रिटिशांच्या प्रभावामुळे तथाकथित मराठी सारस्वतावर खूप आधीपासून इंग्रजी ज्ञानविचारांचे अंधानुकरण करणा-या नवमतवादी विचारांचा पगडा बसला. आजही तो कायम आहे. अर्थात त्याला मधूनमधून हादरे बसत असतात; परंतु त्याचा पाया उखडणे शक्य झाले नाही, पुढेही होणार नाही. कारण आजही मराठीत निर्माण होणा-या बहुतांश साहित्याची निर्मिती आणि प्रसार याची व्याप्ती शहरी, निमशहरी भागातील मध्यमवर्गीय वाचकांपुरतीच आहे. या वाङ्मयात रंजकतेला प्राधान्य असल्याने देशी लोकांच्या प्रबोधनाचा विचारही केलेला दिसत नाही. परिणामी मोठ्या-मोठ्या लेखकांच्या पुस्तकांची एक आवृत्ती म्हणजे अकराशे प्रती संपायला महाराष्ट्रात वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते.

त्या तुलनेत प्रगत तंत्रज्ञानाने, संगणकयुगाच्या नवनव्या शोधांनी युरोप-अमेरिकेतील पुस्तक छापणा-यांसमोर खूप मोठी आव्हाने उभी केली. तरीही त्या प्रगत देशातील पुस्तक छपाई आणि विक्री दररोज, होय दररोज खपाचे नवनवे टप्पे पार पाडत आहे. ई-बुक रीडर, किंडल, टॅब्लेट या नव्या साधनांनी पुस्तकांना ‘स्वस्त’ केले. शिवाय मध्यस्थांची - पुस्तक वितरक, विक्रेते अशी जी - साखळी होती, तीसुद्धा तोडली होती. परंतु गेल्या नाताळात अमेरिकेतील ई-वाचकांना पुन्हा पुस्तकाच्या जुन्या ‘फॉर्म’कडे वळावेसे वाटले. जानेवारी 2012मध्ये अमेरिकन बुकसेलर्स असोसिएशनने सांगितले की, ‘आधीच्या हंगामापेक्षा नाताळातील पुस्तकविक्री तब्बल 16 टक्क्यांनी वाढली.’ हीच स्थिती इंग्लंडमध्ये आहे. पण तरीही तंत्रज्ञानाच्या सुलभीकरणामुळे पुस्तक वाचकांचा ई-वाचनाकडे वळणारा लोंढा मोठा आहे, हे नाकारता येत नाही.

या पार्श्वभूमीवर पुस्तक लेखन करणा-या मंडळींना कोट्यवधी रुपये मिळवून देणा-या या व्यवसायाला आपल्या महाराष्ट्रात मात्र अजूनही प्रकाशकाधीनच राहावे लागलेले दिसते. वर्षानुवर्षे प्रकाशन व्यवसायात राहून नवनवीन पुस्तके काढणा-या प्रथितयश प्रकाशकांनी तोट्याचे रडगाणे गाणे कधीच थांबवलेले दिसत नाही. स्वत:ला मराठी भाषा, संस्कृतीचे मक्तेदार म्हणवणारे मोठे प्रकाशक आणि त्यांचा कारभार हा साराच गंभीर मामला आहे. लेखकाच्या लिखाणाचे संपादन-संशोधन करण्याच्या फंदात पडण्यापेक्षा आर्थिक फायद्याचा विचार करणे हे पुढारलेल्या प्रकाशकाच्या यशाचे गमक असते. त्यामुळे प्रकाशकाच्या ‘हिशेबा’मध्ये न बसणा-या विचारांची पुस्तके छपाईच्या यादीतून आपोआप गळतात. त्यातही छपाईची यादी मोठी असेल तर ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मंडळींच्या तुलनेत नवोदितांच्या कलाकृतीवर फुली मारली जाते, भलेही ते किती चांगले पुस्तक असो. याचा परिणाम असा होतो की, प्रतिभावान कवी वा लेखक अशा प्रकाशकांचा नाद सोडतो. परिणामी समाज एका दर्जेदार वाङ्मयीन निर्मितीपासून दूर राहतो. समजा त्या लेखक वा कवीकडे आर्थिक पाठबळ असेल तर तो स्वत:च पुस्तक छपाईच्या क्षेत्रात उडी मारतो. येथेही त्याची उडी चुकते; कारण छपाईच्या क्षेत्रातील कागदांपासून छपाईपर्यंतच्या कामात खर्चाचे आकडे नवख्यांसाठी वाढणारे असतात. त्याचा त्याला चांगलाच ‘अनुभव’ येतो आणि त्यानंतरची खरी कसोटी असते पुस्तक वितरणाची. या क्षेत्रात हा नवखा साहित्यिक मार खातो. अगदी पदरमोड करून प्रकाशित केलेली साहित्यकृती वितरण अवस्थेअभावी वाचकांपर्यंत पोचत नाही. पुस्तकाचे दुकानदार पुस्तकाला निम्म्या दरातही स्वीकारायला तयार नसतात. परिणामी स्वखर्चाने केलेल्या प्रकाशन सोहळ्याच्या भरुदडासह पुस्तकाच्या निर्मितीसाठी केलेल्या सगळा खर्च आणि खटाटोप साहित्यिकाच्या डोक्यावर पडतो. त्यामुळे कितीही प्रतिभावान वा धनवान लेखक पुन्हा पुस्तक प्रकाशनाच्या भानगडीत पडत नाही. परिणामी वाचक एका चांगल्या लेखकापासून दुरावतात. 

थोडक्यात, पुस्तक प्रकाशन आणि वितरणाच्या साखळीवर हुकूमत असणा-या मूठभर मंडळींनी मराठी सारस्वताची दशा आणि दिशा काय असावी, असे ठरवल्याने मराठी वाङ्मयाची फारशी प्रगती झाली नाही. त्या तुलनेत इंग्रजीचा वाढता व्याप पाहिल्यास राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या भाषेत प्रचंड प्रमाणावर पुस्तके प्रसिद्ध होताना दिसतात. अमेरिकेत दरवर्षी आठ ते अकरा हजार नवे प्रकाशक उदयाला येतात. प्रस्थापित पन्नास हजारहून अधिक प्रकाशकांच्या माध्यमातून अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर पुस्तके बाजारात येतात. एक चांगला प्रकाशक वर्षाला 10 ते 50 पुस्तके प्रसिद्ध करतो. विशेष म्हणजे या एकूण पुस्तकांपैकी 78 टक्के पुस्तकांची निर्मिती छोट्या प्रकाशकांकडून झालेली असते. सुमारे 52 टक्के पुस्तके दुकानात जात नाहीत. इंटरनेट, बुक क्लब आदी माध्यमातून ती वाचकांपर्यंत पोहचतात. पुस्तकविक्रीचे आकडे हजारांपासून लाखांपर्यंत सहजपणे फिरत असतात; कारण युरोप-अमेरिकेतील साक्षरतेला समृद्धी आणि सजगतेची जोड लाभलेली आहे.

आपल्याकडे 2011च्या जनगणनेनुसार साक्षरतेचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या 75.6 टक्के असल्याचे दिसते. जगाच्या एकूण लोकसंख्येची सरासरी साक्षरता 84 टक्के आहे. म्हणजे आपण त्या सरासरीच्या जवळपासही अजून गेलेलो नाही. त्यामुळे भारतात आज जेवढे निरक्षर आहेत (30 कोटी लोकांहून जास्त) तेवढे जगातील कोणत्याच देशात नाहीत. त्याहून खेदाची गोष्ट म्हणजे स्त्री आणि पुरुषांच्या साक्षरतेच्या प्रमाणातील तफावत, पुरुषांमध्ये साक्षरतेचे प्रमाण 82.14 टक्के आहे तर स्त्रियांमध्ये ते प्रमाण 65.46 टक्के असल्याचे 2011च्या जनगणनेत स्पष्ट झाले आहे.

घरातील महिला निरक्षर असणे ही बाब कुटुंबनियोजन, कौटुंबिक आरोग्य आणि शिक्षण या सगळ्याच गोष्टींना मारक ठरते, हे येथे वेगळे सांगायला नको. सध्या तर अशा निरक्षरांना साक्षर करण्यासाठी शासकीय पातळीवर होत असलेले प्रयत्न ब-यापैकी मंदावलेले दिसत आहेत. गेल्या दशकातील साक्षरतेची वाढ (नऊ टक्के) त्याची साक्ष पटवते. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील निरक्षरांना साक्षर करण्यासाठी एक मोठी जनमोहीम उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या ओळखीतील निरक्षर व्यक्तीला साक्षरतेचा आणि शाळेत न जाऊ शकणा-या मुलाला शाळेचा मार्ग दाखवला तरी या समस्येवर वेगाने मात करता येईल; परंतु दुर्दैवाने सगळ्याच गोष्टींसाठी सरकारला जबाबदार ठरवून टीका करण्याचे अधिकार मध्यमवर्गीय लोकांनी हाती घेतले आहेत. त्याच वेळी स्वकर्तव्याकडेही त्यांनी सोयीस्करपणे पाठ फिरवल्याने साक्षर- निरक्षरतेचा भेद दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे.

भारतात एकीकडे निरक्षर आणि नवसाक्षरांचा प्रश्न आहे, तर दुसरीकडे इंग्रजी शिकलेल्या लोकांची संख्याही वाढत आहे. ग्रामीण भागामध्ये इंग्रजी शाळांचे प्रमाण प्रचंड वेगाने वाढताना दिसत आहे.

भारतातील पुस्तकांची बाजारपेठ अन्य भाषिक पुस्तकांच्या तुलनेत वेगाने प्रस्थापित होताना दिसत आहे. ‘निल्सन बुक स्कॅन इंडिया’च्या आकडेवारीनुसार 2011च्या पहिल्या सत्रामध्ये भारतातील पुस्तकांची विक्री 45 टक्क्यांनी वाढली. चेतन भगत यांच्यासारख्या प्रसिद्ध लेखकाच्या पुस्तकाच्या तीन लाखांहून अधिक प्रती खपतात, हे या पॅनलच्या आकडेवारीवरून सिद्ध होते. त्याच जोडीला भारतीय बाजारात जेफ्री आर्चर असो व स्टिव्ह जॉब्स्चे चरित्र असो, यांना चांगलीच बाजारपेठ आहे, हे कळल्यामुळे जगातील बहुतांश नामवंत कंपन्यांनी भारतीय सुशिक्षितांकडे लक्ष देण्यास सुरुवात केलेली आहे. मोठे बजेट, मोठा आवाका आणि संपादन-संशोधनातील प्रावीण्य यामुळे भारतीय प्रकाशकांना या बहुराष्ट्रीय प्रकाशकांची बरोबरी करता येणे शक्य नाही. 

अशा वेळी भारतातील सर्वच भाषेतील प्रकाशकांना आपापल्या भाषेशिवाय पर्याय उरणार नाही. शहरातील ऑनलाईन किंवा वातानुकूलित दुकानात खरेदी करणा-या मंडळींना बहुराष्ट्रीय किंवा बड्या कंपन्यांनी आपल्याकडे खेचून घेतलेले असल्याने ग्रामीण आणि निमशहरी वाचक हेच छोट्या-मोठ्या देशी कंपन्यांचे आश्रयदाते असतील; कारण भारतात इंग्रजीचा प्रभाव आणि प्रसार कितीही वाढला तरी अजून किमान शंभर वर्षे तरी ग्रामीण भागात मराठीचाच वापर सर्रासपणे होत राहील. या ग्रामीण आणि बहुजनवाचकांच्या माथ्यावर सुरुवातीपासून अभिजनांच्या भावजीवनाशी किंवा समाजजीवनाशी संबंधित विषय मारण्यात आले. 

आजही मराठीतील लोकप्रिय कवी, कथाकार वा विनोदी लेखकांनी चितारलेली कथा-कल्पना आणि पात्रे शहरातील चाळ वा फ्लॅट संस्कृतीतीलच असतात. मराठीतील बहुतांश गाजलेली नाटके, कादंब-या, कथासंग्रह या सगळ्याचा केंद्रबिंदू कायमच शहरी मध्यमवर्गाच्या अवतीभवती फिरत राहिलेला दिसतो. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र प्रज्ञेचा विलास झालेला दिसत नाही. पाश्चात्य वा पौर्वात्य विचारवंतांची भाषांतरे किंवा अनुकरण करून, त्यावर भाष्य करणे ही आपल्याकडे स्वातंत्र्यपूर्वकाळापासून एक पद्धतच बनली. स्वत: एखाद्या विषयाचा पुरेसा अभ्यास करणे, आकलन आणि चिंतन झाल्यावर त्यावर आपले परखड मत व्यक्त करणे आदी विषयात आम्ही मराठी लोक कायमच मागे राहिलो. 

यासंदर्भात 1930 मध्ये गोव्यात झालेल्या पंधराव्या महाराष्ट्र साहित्य संमेलनात अध्यक्षपदावरून बोलताना   प्रा. वामनराव जोशी म्हणाले होते, ‘‘तत्त्वज्ञान, धर्म, समाजशास्त्र वगैरेंच्या बाबतीत अगदी मुळापर्यंत जाण्याची व स्वतंत्रपणे विचार करण्याची फारशी ताकद आपणात आलेली नाही व म्हणूनच आपण दुस-यांच्या ग्रंथांची भाषांतर करून, टीका आणि सारांश लिहून आपले समाधान करून घेतो आणि लोकांचे समाधान करू पाहतो.’’

प्रा. जोशी तिथेच थांबत नाहीत, ते स्पष्टपणे सांगतात, ‘आपल्याकडे सत्य शोधणारे, सत्य बोलणारे व सत्य ऐकणारे फार थोडे.’ आज सुमारे 80 वर्षानंतरही प्रा. जोशी यांनी वर्णिलेली स्थिती बदललेली नाही. मराठी ग्रंथकार सभेने न्यायमूर्ती रानडे यांच्यामार्फत महात्मा फुले यांना निमंत्रण पाठवले हाते. त्यावर फुले यांनी रोखठोक उत्तर दिले होते, ‘यांच्यात मिसळल्याने आम्हा शुद्रातिशुद्रांचा काहीच फायदा होणे नाही. आम्हीच आमचा विचार केला पाहिजे.’ 

इतक्या वर्षानंतर आजच्या ग्रंथनिर्मितीकडे पाहिल्यावर फुले यांचे विचार आजही समर्पक वाटतात; पण त्यानुसार सर्वसामान्य लोकांसाठी, लोकभाषेत पुस्तके येत नाहीत, आली तर ती लोकांपर्यंत पोचत नाहीत, ही एक मोठी खंत आहे. ती यावी, चांगली खपावी एवढीच उद्याच्या जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने अपेक्षा. कारण पुस्तक म्ह्णजे निर्जीव वस्तू नाही. पुस्तक आहे कोणतीच अपेक्षा न ठेवता आपले अंतरंग मोकळे करणारा, मनोरंजन करणारा, मार्ग दाखवणारा, कधी गुरू तर कधी वडीलकीच्या नात्याने सल्ले देणारा, पण त्यासाठी तुम्हाला त्याच्याजवळ जाता आले पाहिजे..मग पहा त्याच्या पानापानातून कशी ज्ञान-रंजनाची अखंड सळसळ ऐकू येईल.

दिवंगत रंगकर्मी सफदर हाश्मी यांच्याच शब्दात सांगायचे तर –

किताबें, करती है बाते
बीते जमानों की
दुनिया की, इन्सानो की
आज की, कल की
एक-एक पल की
खुशियों की, गमों की
फुलों की, बमों की
जीत की, हार की
प्यार की, मार की।
क्या तूम नही सुनोंगे
इन किताबों की बातें
किताबे कुछ कहना चाहती है
तुम्हारे पास रहना चाहती है।


अक्षरप्रेमाचे बीज आणि शब्दांचा मोहोर

एकत्र कुटुंबपद्धती असणा-या शेतक-यांच्या अवाढव्य घरांमध्ये शेतीच्या हंगामानुसार अवजारांची आणि माणसांची गर्दी असते. धान्याची पोती ट्रंका-बॅगा यांनी घराचे मोठ-मोठे कोपरे वर्षानुवर्षे बळकावलेले असतात. माणसांना मात्र छोट्या खोल्यांमध्ये रेटलेले असते, अशा फक्त 50-55 सदस्यीय घरात माझा जन्म झाला. बालपणही तेथेच गेले. सण-समारंभ पाव्हणे-रावळे यांच्या गजबजाटात पुस्तक वाचण्याची वा अभ्यास करण्याची फुरसत नसे. पण अवती-भवतीच्या वातावरणातून येणारे शब्द, अक्षरे बोलीभाषेचे रूप, नखरा घेऊन भेटायचे. आजच्या ‘टेक्नोसॅव्ही’ मुलांना मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही किंवा आयपॉडच्या छोट्या पडद्यावर दिसणा-या भल्यामोठ्या दुनियेने वास्तवापासून दूर नेले आहे. व्हर्च्युअल वर्ल्ड किंवा आभासी विश्वात हरवलेल्या या आधुनिक बालपणापेक्षा ते गावरान बालपण खूपच वेगळे होते.. शब्दांची आणि अक्षरांची भेट आईच्या अभंगांमधून आणि आजोबांच्या पोथ्यांमधून झाली. वयाच्या मर्यादेमुळे आकलनाचा प्रश्न नव्हता; पण शब्दांची लय, गती, नाद आणि मुख्य म्हणजे शब्दांचा गंध बालवयातच कळू लागला. आजोबा वर्षानुवर्षे पाठांतर झालेल्या पोथीतील, श्लोकातील ओळी खणखणीतपणे उच्चारायचे. त्याचवेळी देवघरात उदबत्ती लागलेली असायची, परिणामी ‘कैलासराणा शिवचंद्र मौळी, फणिंद्रमाथा भ्रुकुटी झळाळी, कारुण्यसिंधो भवदु:ख हारी, तुजविण शंभो मज कोण तारी’ या ओळीतील आर्त आळवणीला भक्तीचा गंध आपोआप लगडायचा. गडबड गोंधळ करणारी मुले-माणसे आपोआप शांत व्हायची आणि जुन्यापुराण्या पोथ्यांमधील शब्द सजीव होऊन नाचू लागायचे. मग आई म्हणायची, ‘बघा अण्णांचे किती ग्रंथ तोंडपाठ आहेत, तुम्हाला चार ओळींची कविता पाठ होत नाही.’ आईच्या त्या शब्दांनी माझ्या मनात अक्षरप्रेमाचे बी रुजवले. तसे पाहिले तर आई फार शिकलेली नसली तरी तिच्या काळातील सगळ्या महत्त्वाच्या कविता, शेकडो अभंग अगदी मुखोद्गत; पण घरात इतर लोक असतील तर तिचे तोंड कायम बंद, हात मात्र कामात गुंग. सगळ्यात लहान असल्यामुळे असेल कदाचित मी मात्र तिच्याच मागे, अगदी जेवतानासुद्धा. त्यामुळे तिच्या गुणगुणण्यातून बाहेर पडणा-या कवितांच्या वा अभंगांच्या ओळी सतत कानावर पडत गेल्या आणि आयुष्याच्या सुरुवातीच्या काळालाच शब्दवेली लगडत गेल्या..

पुढे वयाच्या 12-13व्या वर्षीच आमच्या वाडा गावातील महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालयाची ओळख झाली. निमित्तही मोठे चमत्कारिक होते, काही प्रतिष्ठित मंडळींनी माझ्या वडिलांनी वाचनालयाचे अध्यक्षपद भूषवावे, असा आग्रह धरला होता. थोरा-मोठ्यांना नाही कसे म्हणायचे म्हणून, वडीलही तयार झाले, अध्यक्ष होण्यासाठी वाचनालयाचा सदस्य होणे गरजेचे होते. वडील सदस्य झाले; पण जेव्हा त्यांना वाचनालयातील गडबडींची कल्पना आली, त्यावेळी त्यांनी अध्यक्षपद निग्रहाने नाकारले. मात्र त्या काळात एके दिवशी मोठय़ा कौतुकाने त्यांनी मला वाचनालयात नेले आणि त्या एका प्रसंगाने पुस्तकाचे अवघे विश्व नजरेच्या टप्प्यात आले आणि जगणे बदलत गेले..

चिमटीत बसतील अशा जादुई, रंगीबेरंगी, राजकुमार-राजकन्या आणि दुष्ट राक्षसांच्या पुस्तकांनी बालपणीचा काळ सुखाचा झाला. कुमारवयात साहसकथांनी टारझन, स्पायडरमॅन, झुंझार अशा एक ना अनेक पुस्तकांच्या संगतीत जगण्याची अभिलाषा बदलत होती. त्याच काळात वृत्तपत्रीय पुरवण्यांच्या वाचनाची सवय जडत गेली. दहावीला जाईपर्यंत अवांतर वाचनाने शाळेतील अभ्यासाला पार मागे टाकले होते. पुढे पुढे तर फक्त परीक्षेपुरता अभ्यास, अन्य काळात वाचन हा एककलमी कार्यक्रम बनला. बाबासाहेब पुरंदरे यांचे शिवचरित्र, वि. ग. कानिटकर यांचे ‘नाझी भस्मासुराचा उदयास्त’, वि. स. वाळिंबे यांचे ‘स्वातंत्र्यवीर’, शिवाजी सावंत यांची ‘मृत्युंजय’, ‘छावा’ अशा एकापेक्षा एक पुस्तकांच्या संगतीत शाळा-कॉलेजची वर्षे उडून गेली. 

आपल्या आयुष्यावर जवळच्या आप्तमित्रांचा जसा प्रभाव पडतो, तसा पुस्तकांचाही पडतो. म्हणून हेन्री शॉटियरचे ‘पॅपिलॉन’ किंवा चे गव्हेरा यांचे ‘मोटर सायकल डायरीज्’ वाचल्यावर मनात आत्मविश्वासाचा झरा उफाळून येतो. ‘तुकारामांची गाथा’ किंवा तुकडोजी महाराजांची ‘ग्रामगीता’ वाचल्यावर जगण्यातील अध्यात्म कळते. गोनीदा किंवा अमृतलाल वेगड यांच्या नर्मदा परिक्रमेच्या वर्णनातून किंवा त्रिं. ना. आत्रे यांच्या 1915 साली प्रसिद्ध झालेल्या ‘गावगाडा’मधून ग्रामीण भारत दिसतो. वॉरियल एल्विन, गोदूताई परुळेकर, अनुताई वाघ यांच्या आदिवासीविषयक पुस्तकांमधून एक वेगळे विश्व समजते. पावलो कोएलो यांच्या ‘अल्केमिस्ट’मुळे जगाचा शोध स्वत:मध्ये सुरू होतो आणि स्वत:मध्येच संपतो याचा साक्षात्कार होतो; तर रजनीश, कबीर आणि जे. कृष्णमूर्ती अध्यात्माचा वेगळा अर्थ सांगतात. ‘टाईम्स ऑफ इंडिया’चे प्रदीर्घ काळ संपादक राहिलेल्या शाम लाल किंवा ‘नवशक्ती’चे विद्वान संपादक स्व. प्रभाकर पाध्ये यांच्या अनुक्रमे ‘इंडियन रिअ‍ॅलिटीज् इन बीट्स अ‍ॅण्ड पिसेस’ आणि ‘आजकालचा महाराष्ट्र’ या पुस्तकांनी तसेच ‘आऊटलुक’चे संपादक विनोद मेहता यांच्या ‘लखनौ बॉय’ या आत्मचरित्राच्या वाचनाने प्रामाणिक आणि सरळमार्गी जगण्याचा अर्थ उमगतो. पुस्तकांनी एवढा फायदा होऊ शकतो, हे मला ठाऊक नव्हते. पण अगदी बालवयात आईने रुजवलेले अक्षरबीज शाळेतील सहस्त्रबुद्धे बाई, झांबरे सर यांच्या प्रेमाने वाढले, पुढे महाविद्यालयात प्राचार्य रमेश वरखेडे यांच्या मार्गदर्शनाने ते फोफावले आणि पत्रकारितेत राधाकृष्ण नार्वेकर, मिलिंद गाडगीळ, सोमनाथ पाटील, दिलीप चावरे या ज्येष्ठांच्या संगतीत त्याला शब्दांचा मोहोर फुटला.. माणसाने एवढ्यावर समाधानी राहू नये, कारण मोहोराचे फळात रूपांतर होण्यातच जीवनाची सार्थकता आहे!

Categories:

Leave a Reply