२०१२ संपून २०१३चा प्रारंभ होत आहे. एकविसाव्या शतकातले हे पहिले तप होते. ते संपून दुस-या तपात प्रवेश करताना मनात उमटणारा प्रश्न असा की, आपण या तपभरात काय मिळवले आहे. याचे उत्तर शोधताना असे लक्षात येते की, जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न बघणा-या आपल्या देशाला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. यासाठी आजच्या तरुणांनी आपापल्या आवडीच्या क्षेत्रांत स्वत:ला गाडून तपश्चर्येला सुरुवात केली पाहिजे. नव्या वर्षात अन्य कुठलाही संकल्प न सोडता, आपण जे काही काम करतो, त्यात आम्ही निष्ठेने आणि प्रामाणिकपणे केले पाहिजे. आम्ही आमच्या कामात चांगले प्रावीण्य, यश मिळवण्याचा निर्धार केला तरच भारताचे भवितव्य उज्ज्वल बनेल.
एकटया-दुकटया तरुणीची छेडछाड, विनयभंग, बलात्कार, अपहरण आणि खून या प्रकारांना सध्या देशभरात अक्षरश: ऊत आला आहे. स्त्रीकडे बघण्याचा परंपरागत दृष्टिकोन हे याचे सगळ्यात मोठे कारण आहे. शिक्षणाने स्त्री समर्थ झाली तरी ती म्हणजे उपभोगाचे साधन, मूल देणारे यंत्र, फुकट राबणारी नोकर हाच संकुचित आणि अमानुष विचार आपल्या समाजाने वर्षानुवर्षे केला. त्यातून स्त्रीचे प्रत्येक टप्प्यावर शोषण झाले. आज महिलांवर अत्याचार करून गाजवला जाणारा ‘पुरुषार्थ’ याच बुरसट विचारसरणीचा परिपाक आहे. त्यामुळे स्त्रीत्वाचा अपमान करणा-या प्रवृत्तीचा नायनाट करायचा तर स्त्रीला देवीचा दर्जा देण्याची गरज नाही तर तिच्याशी समान पातळीवर नाते जोडायला हवे.